राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्येच्या शपथविधीवर ऐतिहासिक टप्पा
साईमत/मुंबई/प्रतिनिधी –:
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील दुर्दैवी विमान अपघातात निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आणि त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याच्या सत्तासमीकरणात नवा अध्याय सुरू केला आहे. सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत, ही ऐतिहासिक बाब मानली जात आहे.
अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या शोकाकुल वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटाची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्यास छगन भुजबळ यांनी मान्यता दिली. उपस्थित आमदारांनी एकमताने प्रस्ताव मंजूर करून सुनेत्रा पवार यांची अधिकृतपणे विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली.
यानंतर धनंजय मुंडे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि संजय बनसोडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेत गटनेतेपदाच्या निवडीचे पत्र सुपूर्द केले. मुख्यमंत्र्यांकडून हे पत्र राज्यपालांकडे पाठवण्यात आले.
शपथविधी सोहळा लोकभवनातील दरबार हॉलमध्ये अत्यंत साधेपणाने पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी यांसह मोजकेच मान्यवर उपस्थित होते. सोहळा अवघ्या दहा मिनिटांत पार पडला आणि शोकाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही औपचारिकता किंवा मोठा समारंभ टाळण्यात आला.
सुनेत्रा पवार शुक्रवारी रात्री बारामतीतून मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. सकाळपासूनच मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला; गटनेतेपदाची निवड, मुख्यमंत्र्यांची भेट आणि लगेच शपथविधी या सर्व झपाट्याने घडलेल्या घटनांनी राज्याच्या राजकारणात मोठी हलचाल निर्माण केली.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार बारामतीकडे परतण्याच्या तयारीत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर दहावा विधी पूर्ण होईपर्यंत त्या बारामतीतच मुक्काम करणार आहेत. या काळात कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भेटी घेणार असले तरी कोणतेही सत्कार किंवा हार-तुरा स्वीकारणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील सत्तेच्या पातळीवर मोठ्या शोकांतिकेनंतर झालेला हा बदल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, सुनेत्रा पवार यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसने नेतृत्व आणि सातत्य टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार यांच्या वारशाला पुढे नेताना सुनेत्रा पवारला प्रशासन आणि राजकारणात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार असल्याची चर्चा सुरू आहे.
