फैजपुरला ‘आत्मनिर्भर युवती’ अभियानाचा यशस्वी समारोप

0
9

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी

जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि फैजपूर तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आत्मनिर्भर युवती’ अभियानाचा यशस्वी समारोप नुकताच करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ.पी.डी.पाटील होते. सहा दिवस घेण्यात आलेल्या अभियानात ७५ विद्यार्थिनींचा सहभाग होता. अभियानाचे उद्घाटन १२ फेब्रुवारीला झाले होते.

उद्घाटक म्हणून यावलच्या सरकारी वकील सुल्ताना तडवी यांनी महिलांसाठी विविध कायद्यांची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी अनिल हेडाऊ (शाखा व्यवस्थापक, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, भुसावळ) यांनी राष्ट्रीयकृत बँकेत महिलांसाठी विविध योजनांची माहिती दिली. तिसऱ्या दिवशी डॉ. संजीवकुमार साळवे (जी.जी.खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर) यांनी महिला स्वयंरोजगार व विविध योजना तसेच चौथ्या दिवशी डॉ. गौरव चौधरी यांनी ‘महिलांचे आरोग्य’ विषयावर मार्गदर्शन केले. पाचव्या दिवशी विद्यार्थिनींमध्ये उद्योजकता कौशल्य विकसित व्हावे, म्हणून सावदा येथील औद्योगिक वसाहतीत विविध उद्योग आणि लघुउद्योग संस्थांना भेट दिली. याप्रसंगी उद्योजक प्रभुदास जंजाळकर (संचालक रामेश्‍वरम्‌ इंडस्ट्री- एमआयडीसी, सावदा) यांनी मार्गदर्शन केले. तसेच श्रीकृष्ण इरिगेशन इंडस्ट्री, मिल्क डेअरी, गृह उद्योग अश्‍या उद्योग समूहांना भेट दिली. त्यातील कौशल्य जाणून घेतले. अश्‍या प्रकारे सहा दिवस विविध कार्यक्रम राबवून ‘आत्मनिर्भर युवती’ अभियान घेण्यात आले. सहाव्या दिवशी अभियानाचा यशस्वी समारोप करण्यात आला.

समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.पी.डी.पाटील यांनी आत्मनिर्भर कसे व्हावे, आत्मनिर्भर होण्यासाठी शिक्षणाबरोबरच इतर कौशल्य विकसित करावेत, असे सांगितले. तसेच विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय सोनजे यांनीही विभागाच्यावतीने अनेक बौद्धिक कार्यक्रम, विचारवंतांचे व्याख्यान, कार्यशाळा व इतर कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात प्रामुख्याने भाग घ्यावा. त्यातून तुमच्या ज्ञानात एक वेगळ्या विषयाची भर पडते आणि विविध विषयांवर आपले विचार फुलतात. अश्‍या कार्यक्रमांतूनच खरे व्यक्तित्व घडते. म्हणून जीवनाला आकार देणाऱ्या कार्यक्रमाचा युवतींनी भरपूर लाभ घेतला पाहिजे. हीच शिक्षकांची अपेक्षा असते, असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी पौर्णिमा कोळी, तेजल वयकोळे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी केला. कार्यक्रमाला युवती सभा प्रमुख डॉ.जयश्री पाटील, डॉ.सरला तडवी, डॉ. राजश्री नेमाडे, डॉ.सविता वाघमारे, डॉ.सीमा बारी, प्रा.नाहीदा कुरेशी, प्रा.अदिती ढाके यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन नेहा पाटील तर आभार सुमय्या तडवी हिने मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here