दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने शहरात संतापाची लाट
साईमत/भडगाव/प्रतिनिधी :
येथील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ शनिवार दि.२० रोजी संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शाळेतील निष्काळजीपणामुळे दोन चार वर्षीय चिमुकल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप असून या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी एकत्र येत बंदची हाक दिली होती.
शहरवासीयांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भडगाव शहरातील मुख्य बाजारपेठेसह अंतर्गत रस्त्यांवरील सर्व दुकाने, व्यापारी संकुले, हॉटेल्स, भाजीपाला विक्रेते, किराणा दुकाने आणि खासगी आस्थापने पूर्णपणे बंद राहिल्या. सकाळपासूनच शहरात शुकशुकाट दिसत होते. नेहमी गजबजलेली बाजारपेठ पूर्णतः रिकामी पडली होती,
तर सार्वजनिक वाहतूकही अत्यल्प प्रमाणात दिसून आली.ही घटना आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलच्या व्यवस्थापन व शिक्षकांच्या गंभीर निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. शाळेतील असुरक्षित बांधकामे, स्वच्छतागृहाजवळील धोकादायक परिस्थिती तसेच विद्यार्थ्यांकडे योग्य लक्ष न दिल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दोन निष्पाप चिमुकल्यांचा बळी गेल्याने पालकवर्गासह संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.
घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात दोषी शाळा व्यवस्थापन, संचालक मंडळ, मुख्याध्यापक, संबंधित शिक्षक व जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली
निवेदनात शाळेच्या इमारतीचे बांधकाम, परवानग्या, स्वच्छतागृहांची स्थिती तसेच शाळा परिसरातील अतिक्रमण व नाल्यांच्या प्रवाहात बदल करून केलेल्या बांधकामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या निधीचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त करत स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंद शांततेत पार पडला असून नागरिकांनी संयम राखत प्रशासनाकडे आपला रोष व्यक्त केला.ही दुर्दैवी घटना भडगाव शहर हादरून गेली असून प्रशासनाने फक्त आश्वासनांपुरते थांबून न राहता ठोस व कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
