भारत (India) आणि फ्रान्स (France) हे अनेक शतके परस्परांचे मित्र राहिले आहेत. भारतावरचा इंग्रजांचा डोळा आणि पुढे त्यांनी काबीज केलेली भारताची सत्ता यांचाही या मैत्रीला एक सबळ कोन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही सुरतेत फ्रेंच वखारीला हात लावला नव्हता. फ्रेंचांनी राजापूरची वखारही महाराजांच्या परवानगीने चालवली आणि बदल्यात मराठ्यांच्या सैन्याला उत्तम दारुगोळा पुरविला. पुढे इब्राहीम खान गारदी यांच्या नाविक दलाला प्रशिक्षित करेपर्यंत ही मैत्री वाढली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीत सर्वाधिक लक्षणीय करार लष्करी सहकार्याचे झाले आहेत.भारत लढाऊ विमाने आणि अत्याधुनिक पाणबुड्या तर घेणार आहेच पण हिंदुस्थान एरोनॉटिक्स विकसित करीत असलेल्या लढाऊ हेलिकॉप्टरला फ्रेंच बनावटीची इंजिने असणार आहेत.आजवर भारतीय लष्कराचा भर रशियन इंजिनांवर होता.
‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्सिट्युट’ने आपल्या ताज्या अहवालात फ्रान्स हा भारताचा सगळ्यांत मोठा संरक्षण भागीदार बनला आहे, असे म्हटले आहे. भारताच्या एकूण संरक्षण खरेदीत फ्रान्सचा वाटा आता ३० टक्के झाला आहे. अमेरिकेला मागे टाकून फ्रान्स या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घनिष्ट व्यक्तिगत मैत्री असल्याचे सांगितले जाते. या मैत्रीमुळेही पंतप्रधान मोदी यांचा फ्रान्स दौरा अधिक यशस्वी झाला असेल. या दौऱ्यातील सगळेच करार ‘लाभ-लाभ’ अशा रीतीचे म्हणजे दोघांचाही फायदा करून देणारे आहेत.फ्रान्सचे द्रष्टे अध्यक्ष ज्याक शिराक यांनी ‘भारताशी मैत्री हवी’ हा आग्रह पहिल्यांदा जोरकसपणे धरला. तेव्हा भारतात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. या काळात सविस्तर चर्चेनंतर दोघांनी ‘धोरणसिद्ध भागीदार’ बनण्याचा करार केला.तो महत्त्वाचा ठरणारा होता.मोदी पॅरिसमध्ये गेले,त्याला या कराराच्या रौप्यमहोत्सवाची पार्श्वभूमी होती. त्यातूनच, पुढील वाटचाल रेखांकित करणारी सन २०४७ पर्यंतची अत्यंत सविस्तर उद्दिष्टपत्रिका जारी करण्यात आली आहे. भारताच्या स्वातंत्र्याची तेव्हा शताब्दी असेल.
या उद्दिष्टपत्रिकेचे दोन भाग आहेत. पहिला द्विपक्ष संबंधांचा आणि दुसरा जगाच्या कल्याणाची या दोन देशांची दृष्टी.द्विपक्ष संबंधांमध्ये पहिलाच मुद्दा विस्तृत संंरक्षण सहकार्याचा आहे.त्यालाही महत्त्व आहे. भारताने पहिली अणुचाचणी केली तेव्हा अमेरिकेसहित अनेक देशांंनी डोळे वटारले. युरोपात एकटा फ्रान्स तेव्हा वेगळा वागला.एनडीएच्या पहिल्या राजवटीत ‘बुद्ध पुन्हा हसला’ तेव्हाही तसेच घडले.फ्रान्सने भारतावर आर्थिक निर्बंध घालण्यास सरळ नकार दिला. अमेरिका आणि अमेरिकेचे शेपूट कधीही न सोडणारा ब्रिटन यांच्यापेक्षा फ्रान्सचे धोरण नेहेमीच स्वतंत्र,वेगळे राहिले आहे.
ते भारतहिताचे आहे. ‘फ्रान्स हा अमेरिकेचा मित्र आहे; गुलाम नाही,’ अशा शब्दांत मॅक्रॉन यांनी अलीकडेच ‘राष्ट्रीय भावनां’ना शब्द दिले होते. ‘नाटो’चे एक कार्यालय जपानमध्ये उघडण्याचा प्रस्तावही एकट्या मॅक्रॉन यांनी अलीकडेच रोखला.भारतासाठीही हे महत्त्वाचे आहे.कोरोना काळात फ्रान्सच्या अर्थकारणाला जबर धक्का बसला.आर्थिक महासत्ता होणे, हे भारत व फ्रान्स यांचे समान स्वप्न आहे. मॅक्रॉन यांनी कंपनी कर कमी केला.कामगार कायदे बदलले आणि व्यवसाय प्रशिक्षणाचे दरवाजे जगासाठी अधिक खुले केले मात्र,फ्रान्समधील या संधींचा लाभ घेण्यात भारतीय मागे आहेत.
हे चित्र बदलण्याचा विचार उद्दिष्टपत्रिकेत आहे.चिरंजीव ऊर्जा,आण्विक क्षेत्र,पर्यावरण, जलसंंधारण, हायड्रोजनचा वापर, कृषितंत्रज्ञान अशा अनेक विषयांमध्ये फ्रान्सने मोठी मजल मारली आहे.या साऱ्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यास मोठा वाव आहे.तसे ते झाले तर भारताला सौरऊर्जेसहित अनेक आघाड्यांवर आणखी मोठी मजल मारता येणे सहज शक्य आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील सांस्कृतिक तसेच भाषिक, वाङ्मयीन संयुक्त उपक्रम व साहचर्याला दिलेले महत्त्व औपचारिक वाटले तरी ते अतिशय मोलाचे आहे.या पार्श्वभूमीवर या कलासक्त परंतु प्रगत देशाशी असणारी मैत्री अधिक दृढ झाली पाहिजे.पंतप्रधानांच्या दौऱ्याने हे काम केले आहे,असे म्हटल्यास वावगे ठरु नये.
