गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून नागरिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. मात्र दुसरीकडे मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये भिती व दहशतीचे वातावरण आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात रात्रीच्या वेळी दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अनेक कुटुंबे, लहान मुले व महिला रात्रीच्या वेळेस गणपती बघण्यासाठी बाहेर पडतात. मात्र, अशा वेळी गल्लीबोळात तसेच मुख्य रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचे टोळके आढळून येत आहेत. काही वेळा या कुत्र्यांनी नागरिकांना चावा देखील घेतला असून अनेक लहान मुले जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. मुख्य परिवर्तन चौकासारख्या गजबजलेल्या भागातही या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. हे कुत्रे रस्त्यावर झुंडीने बसत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. दुचाकीस्वारांच्या मागे लागणे, गाडीवर भुंकणे यामुळे काही अपघात देखील घडले आहेत.
विशेषतः दुचाकीस्वारांबरोबर असलेल्या लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.शहरातील विविध भागांत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप नगरपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता सुज्ञ नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तरी नगरपंचायतीने या समस्येकडे लक्ष द्यावे.
प्रशासनाने त्वरीत पावले उचलून या मोकाट कुत्र्यांवर उपाययोजना कराव्यात, अन्यथा एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नागरिकांतर्फे सांगण्यात आले