साईमत, जळगाव : विवेक ठाकरे
येत्या ७ जूनला मृग नक्षत्राचा मुहूर्त आहे,खरीपाच्या पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत अन् बी-बियाण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांची लगबग सुरु असतांना कृषि विभागाला सचिव आणि नुकतेच बदलीने रिक्त झालेले आयुक्तच नसल्याने ऐन हंगामात शेतकरी वाऱ्यावर आहे. राज्य कृषि आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांची ३१ मे रोजी नाशिकला बदली झाल्याने आज त्यांचा पदभार कुणाकडे तरी प्रभारी म्हणून सोपवण्यात येईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे राज्याचा कृषि विभाग प्रभारीराजच्या गर्तेत अडकला आहे.
राज्याच्या कृषि मंत्री कार्यालयातून राबविण्यात आलेल्या बेकायदा निविदा प्रक्रियेला विरोध केल्याने लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी कृषि कृषि विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार यांची सहकार खात्यात बदली केली गेली होती. अनुपकुमार यांचा प्रभारी कारभार शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
राज्याची आर्थिक घडी बसवणारा कृषि विभाग कायम व पूर्णवेळ विभागाला सचिव व आयुक्त नसल्याने अडचणीत आला आहे. ऐन खरीपात शेतकऱ्यांना बियाणे व खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावीत तसेच बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीवर अंकुश ठेवता येण्यासाठी या दोन्ही पदांवर पूर्णवेळ नियुक्ती होणे आवश्यक आहे. तथापि लोकसभेची आचारसंहितेत कुठलाच धोरणत्मक निर्णय घेतला जाणार नसल्याने राज्याचे कृषि मंत्री धनंजय मुंडे पर्यटनासाठी विदेशात असल्याने सुद्धा विभागाकडे दुर्लक्ष होत आहे.
दरम्यान, कृषि विभागाचे अतिरिक्त सचिव आणि राज्याचे कृषि आयुक्त यांच्या बदलीने शेतकरी वाऱ्यावर असल्याची आणि सरकारला याबाबत काहीही सोयरसुतक नसल्याची बोचरी टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वेडेट्टीवार आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
खरीपासाठी कृषि विभाग सज्ज
खरीपासाठी मुबलक बियाणे आणि खतांचा पुरवठा उपलब्ध आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते, बियाणे आणि कीटकनाशके मिळावीत, यासाठी कृषी विभागाने पूर्ण तयारी केली आहे.
– विकास पाटील (संचालक)
निविष्ठा आणि गुणनियंत्रक
कृषि विभाग, महाराष्ट्र राज्य