साईमत बोदवड प्रतिनिधी
कोरोना काळात बोदवड रेल्वे स्थानकावर थांबा असलेल्या प्रवाशी रेल्वे गाड्यांचा थांबा रद्द केला होता. या गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा म्हणून काही दिवसापूर्वी राष्ट्रीय विकलांग पार्टीने रेल रोको आंदोलन केले होते,मात्र आजतागायत रेल्वे दखल न घेतल्याने रेल्वे प्रशासनास पुन्हा निवेदन देत मागील आंदोलनाचे स्मरणपत्र दिले आहे. दरम्यान मागण्या पूर्ण ना झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सेवाग्राम एक्सप्रेस व सुरत – अमरावती एक्सप्रेस चा अप डाउन चा थांबा येथील स्थानकावर मिळावा भुसावळ रेल्वे विभागातून धावणारी भुसावळ – नागपूर सवारी गाडी पुन्हा सुरू करण्यात यावी. या मागण्यासाठी यापूर्वी 9 ऑगस्ट ला राष्ट्रीय विकलांग पार्टीच्या माध्यमातून रेल रोको आंदोलन केले होते, परंतु त्यानंतर महिना उलटूनही वरील गाड्यांचा थांब्या बाबत रेल्वे मंडळ काहीच हालचाल करत नसल्याने राष्ट्रीय विकलांग पार्टी कडून आमरण उपोषण करण्याबाबतचे निवेदन डी आर एम भुसावळ व जिल्हाधिकारी जळगाव यांना देण्यात आले आहे. निवेदन देते वेळी राष्ट्रीय विकलांग पार्टीचे प्रदेश अध्यक्ष धनराज गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.