शहरातील सुमारे २० ते २२ ठिकाणी धाडी टाकून तपासणी केली.
साईमत/मलकापूर/ प्रतिनिधी :
आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीमुळे अत्यावश्यक वस्तूंच्या संभाव्य तुटवड्याची शक्यता लक्षात घेता मलकापूर शहरात पुरवठा विभागाने कडक भूमिका घेतली आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पुरवठा अधिकारी धनश्रीताई हरणे यांनी दिला आहे.
केंद्र सरकारच्या जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ (कलम ३) तसेच ‘मेंटेनन्स ऑफ प्रॉडक्शन, स्टोरेज अँड सप्लाय’ आदेशानुसार ९ मार्च २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार गॅस एजन्सी धारक, पेट्रोल पंप चालक, हॉटेल, उपहारगृह, ढाबे तसेच मंगल कार्यालय चालकांना घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर टाळण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर तालुका स्तरावर तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष दक्षता पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाने १७ मार्च रोजी शहरातील सुमारे २० ते २२ ठिकाणी धाडी टाकून तपासणी केली. या कारवाईत घरगुती वापरासाठी असलेले तब्बल ११ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले, ज्यामुळे नियमभंग करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
तपासणीदरम्यान कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा साठा पुरेसा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करताना काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलली जातील, असा इशारा पुरवठा अधिकारी धनश्रीताई हरणे यांनी पुन्हा एकदा दिला आहे.
