अजित पवार गटातील आमदाराच्या घरावर दगडफेक

0
10

बीड : वृत्तसंस्था

जिल्ह्यातील माजलगावमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी(अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली आहे. सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्याही मराठा आंदोलकांनी जाळल्या आहेत त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
प्रकाश सोळंके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाची एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. यानंतर मराठा समाज आक्रमक झाला. जमावाने सोळंके यांच्या घरावर मोर्चा काढला. पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्नही केला पण संतप्त झालेल्या जमावाने सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली.
नंतर पार्किंगमधील गाड्या फोडल्या आणि पेटवून देण्यात आल्या.यावेळी प्रकाश सोळंके घरातच असल्याचे सांगण्यात येत आहे.यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे
दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत? गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. एक महिन्यापासून गृहमंत्र्यांचे अपयश सतत सांगत आहे.आमदाराच्या घरावर हल्ला होत असेल तर त्याची नैतिक जबाबदारी गृहमंत्रालय आणि त्रिपल इंजिन खोके सरकारची आहे.महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही?”
आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत
आमदार प्रकाश सोळंके यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. “हा हल्ला जेव्हा झाला तेव्हा मी माझ्या घरात होतो. सुदैवाने माझ्या कुटुंबातील कोणीही सदस्य किंवा कर्मचारी जखमी झाले नाहीत. आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. आगीमुळे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे,” असे प्रकाश सोळंकेंनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here