पाळधीला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन
साईमत/पाळधी, ता.धरणगाव/वार्ताहर :
ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा, संयम आणि शांतता अंगीकारा, विघ्नसंतोषी लोकांकडे दुर्लक्ष करा आणि यशस्वी व्हा, असा त्रिसूत्री मंत्र पाळधी येथे आयोजित कीर्तनात खान्देश भूषण ह.भ.प. रविकिरण महाराज, दोंडाईचेकर यांनी दिला. त्यांनी तरुणांना उदात्त जीवनाचे मार्गदर्शन करत आदर्श विचारांची पेरणी केली. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त पाळधीतील अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाच्या पहिल्या दिवशी रविकिरण महाराजांचे कीर्तन आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. संकीर्तन सप्ताहाचे यंदा सलग तिसरे वर्ष आहे.
कीर्तनात महाराज म्हणाले की, आवडे देवासी तो एक प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा.आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. या अभंगाचे निरूपण करत महाराजांनी अध्यात्म, समाज प्रबोधन आणि मनोरंजनाचा त्रिवेणी संगम भाविक भक्तांसमोर साकारला.
ते पुढे म्हणाले की, जीवनात खूप अडथळे येतात, पण आपण दिव्याच्या प्रकाशासारखे सतत प्रज्ज्वलित राहिले पाहिजे. आपल्या आई-वडिलांची सेवा करा, गुरूंचा सन्मान करा. व्यसनांपासून दूर रहा आणि वयोवृद्धांशी सन्मानाने वागा. आपल्या खास अहिराणी भाषेतील विनोदी शैलीत, उपमा, दृष्टांत आणि गोष्टी सांगत त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. हास्याचे फवारे उडाले. पण त्यामागे खोल अध्यात्मिक अर्थ दडलेला होता. किर्तनाच्या समारोपप्रसंगी गावातील विविध मंडळांकडून ह.भ.प. रविकिरण महाराज यांचा सन्मान करण्यात आला. लहानग्या बाल टाळकरींचा सहभाग विशेष आकर्षण ठरला.
गावाने संस्कृतीचे एकत्रित दर्शन घडवले
महाराजांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कौतुक करत म्हणाले की, गुलाबराव पाटील मंत्री असूनही भक्ती मार्गाला अग्रक्रम देतात. त्यांचे सुपुत्र प्रतापराव आणि विक्रम पाटील यांचे तसेच तरुण सहकाऱ्यांचेही त्यांनी कौतुक केले. कीर्तनाच्या माध्यमातून पाळधी गावाने भक्ती, प्रबोधन आणि संस्कृतीचे एकत्रित दर्शन घडवले.