साईमत, धरणगाव : प्रतिनिधी
खान्देशचे खा.उन्मेष पाटील यांनी धरणगाव आणि अमळनेर स्टेशन अमृत भारत स्कीम अंतर्गत मंजूर केल्याबद्दल मंत्र्यांचे भ्रमणध्वनीद्वारे आभार व्यक्त केले. तसेच विविध मागण्यांविषयी सकारात्मक चर्चा होऊन भुसावळ-पुणे नवीन गाडी व्हाया धरणगाव-अमळनेर-नंदुरबार-पुणे मार्गे सुरू करण्यासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या मागण्यांविषयी त्यांनी आश्वासनही दिले आहे. भारतीय जनता पार्टी, धरणगाव, अमळनेर तालुका व रेल्वे सल्लागार समिती यांनी रेल्वेविषयी सुचविलेल्या विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना शासकीय दौऱ्यावेळी जळगाव येथे डीआरयुसीसी मेंबर प्रतिक जैन यांच्याकडून देण्यात आले.
निवेदनात प्रामुख्याने भुसावळ ते पुणे वाया धरणगाव-अमळनेर-नंदुरबार – पुणे नवीन गाडी सुरू करणे, सुरत-भुसावळ पॅसेंजरच्या वेळेत बदल करण, धरणगाव येथे ताप्ती गंगा एक्सप्रेस, बरोनी एक्सप्रेस, हिसार सिकंदराबाद एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळावा, अमळनेर व धरणगाव स्टेशन अमृत भारत योजनेअंतर्गत प्लानविषयी सूचना, अमळनेर येथे प्रेरणा एक्सप्रेस व चेन्नई-जोधपूर एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच पश्चिम रेल्वे डी. आर. एम. नीरज वर्मा यांना जळगाव रेल्वे स्थानक येथे भेटीवेळी देण्यात आले. धरणगाव आणि अमळनेर स्टेशन अमृत भारत योजनेअंतर्गत विकसित होणार आहे. त्याबद्दल खा.उन्मेष पाटील, धरणगाव व अमळनेर रेल्वे सल्लागार समिती आणि डीआरयुसीसी मेंबर प्रतीक जैन यांनी तसेच जनतेने रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले आहेत.