आ. एकनाथराव खडसे यांची अधिवेशनात मागणी; नऊ वर्षांपासून प्रलंबित प्रकल्पाला गती देण्याची अपेक्षा
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
जळगाव जिल्ह्यास मंजूर झालेले शासकीय पशूवैद्यकीय महाविद्यालय तात्काळ सुरू करावे, अशी मागणी विधानपरिषद सदस्य आ.एकनाथराव खडसे यांनी अधिवेशनात केली. सन २०१६ मध्ये या महाविद्यालयास राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतरही नऊ वर्षांनंतरही प्रत्यक्ष सुरूवात न झाल्यामुळे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.
आ.खडसे पुढे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात पशूवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व मान्यता मिळालेल्या आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी येथे या महाविद्यालयासाठी तब्बल ६० एकर जागा अधिग्रहित करून महाविद्यालयाच्या नावावरही करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतर हे महाविद्यालय सालबर्डी येथे करायचे की जळगाव शहरात, असा प्रश्न उपस्थित होत असून गेली काही वर्षापासून हा प्रकल्प रखडला आहे. तत्कालीन पशुसंवर्धन मंत्र्यांकडून सभागृहात वेळोवेळी आश्वासने मिळूनही प्रत्यक्षात कोणतीही प्रगती झालेली नाही.
आजवर नऊ वर्षांचा कालावधी उलटूनही महाविद्यालय सुरू न झाल्याने जिल्ह्याच्या विकासाला मोठी गती मिळण्याची संधी हुकत असल्याचे खडसे यांनी सांगितले.राज्यात सध्या केवळ सहा पशूवैद्यकीय महाविद्यालये असून, जळगावचे महाविद्यालय हे सातवे होणार होते. पशू चिकित्सकांची वाढती मागणी लक्षात घेता शासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेऊन महाविद्यालय तातडीने सुरू करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
