साईमत / मुंबई
उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने प्रवाशांसाठी भाडेवाढ जाहीर केली आहे. साध्या एसटी बसगाड्यांच्या तिकिटांवर १० टक्के हंगामी वाढ करण्यात आली असून, प्रत्येक तिकिटामागे दोन रुपयांचा स्वच्छता अधिभारही आकारला जाणार आहे.
ही नवी दररचना १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू होणार असून, हंगामी भाडेवाढ १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीपुरती मर्यादित असेल. मात्र, स्वच्छता अधिभार कायमस्वरूपी लागू राहणार आहे. उदाहरणार्थ, सध्या मुंबई-पुणे मार्गावर साध्या एसटीसाठी २८१ रुपये भाडे आहे. भाडेवाढीनंतर हे भाडे ३१२ रुपये होईल आणि त्यावर दोन रुपये अधिभार जोडल्यास एकूण ३१४ रुपये मोजावे लागतील.
राज्य परिवहन प्राधिकरणाने (एसटीए) सुट्ट्या, यात्रा आणि सणासुदीच्या काळात ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्यास मंजुरी दिली असली तरी, यंदाच्या उन्हाळ्यासाठी १० टक्के वाढ लागू करण्यात आली आहे. ही वाढ केवळ साध्या बसगाड्यांसाठी असून, हिरकणी, शयनयान, शिवशाही, जनशिवनेरी, शिवनेरी तसेच ई-बस गाड्या या निर्णयातून वगळण्यात आल्या आहेत.
एसटी महामंडळात सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने बस, स्थानके आणि आगारांच्या स्वच्छतेसाठी कंत्राटी पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. यासाठीच प्रवाशांकडून स्वच्छता अधिभार आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि इतर सवलतधारक प्रवाशांना या अधिभारातून सूट देण्यात आली आहे. “आवडेल तेथे प्रवास” योजनेतील चार व सात दिवसांच्या पाससाठी मात्र पाच रुपयांचा अधिभार आकारला जाणार आहे. आगाऊ आरक्षणातून घेतलेल्या पासवर हा अधिभार लागू राहणार नाही.
दरम्यान, आधीच आरक्षण केलेल्या प्रवाशांकडून वाढीव भाड्याचा फरक प्रवासादरम्यान वसूल करण्याच्या सूचना एसटी प्रशासनाने दिल्या आहेत.
