धार्मिक वातावरणात त्रिवेणी कार्यक्रमांची मांदियाळी
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :
मार्गशीर्ष महिन्यात श्री दत्तात्रय प्रभू जन्मोत्सवाचे औचित्य साधत श्रीकृष्ण ज्ञान मंदिराचा तपपूर्ती वर्धापन दिन, श्री दत्तात्रय प्रभू जन्मोत्सव आणि तथास्तु पंचअवतार उपहार असा त्रिवेणी संगम असलेला भव्य सोहळा संताजी नगर, मलकापूर येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
सकाळी ५ वाजता अधिष्ठानास मंगलस्नान घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर गीता पठण, पारायण आणि सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. आचार्य प्रवर आणि माजी प्राचार्य राजधर शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित धर्मसभेत महान तपस्विनी पोमाईसा सभामंडपात महानुभाव पंथाची तत्त्वज्ञान परंपरा, समाजप्रबोधनातील योगदान आणि धर्ममार्गदर्शनाचे महत्त्व यावर सखोल विवेचन करण्यात आले.पंथाचा ध्वज शांती आणि अहिंसेचा दूत असून, गतिमानतेचे प्रतीक आहे .
याबाबत संतमहंतांनी मार्गदर्शन करताना लीळाचरित्रातील प्रथम लीळेतील “प्राणीमात्रावर दया” आणि “शरण आलेल्यास मरण कैसे?” या चक्रधर स्वामींच्या वचनांचा संदर्भ देत समाजाला मानवतेचा संदेश दिला.
श्रीकृष्ण मंदिराच्या स्थापनेविषयी, आचार्य भीष्माचार्य बाबा जाईचादेव यांच्या पुढाकारातून झालेले कार्य आणि त्यामागील अध्यात्मिक दृष्टिकोन याचे वर्णन महंत देवगावकर कनाशी यांनी आपल्या प्रास्ताविकातून केले. धर्मसभेत पंचअवतारांची कार्यमहती, जीवनमूल्ये, आदर्श समाज निर्मितीसाठीचे तत्त्वज्ञान आणि मोक्षमार्गाकडे वाटचाल करण्याची दिशा याबाबत महंत लासूरकर बाबा, मेहकरकर बाबा, आचार्य लोणारकर बाबा, आचार्य दिवाकर बाबा, आचार्य पांगरीकर बाबा, दत्तराज बाबा, विश्वनाथ शास्त्री यांच्यासह अनेक मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास मलकापूर, नांदुरा, मोताळा, खामगाव, बोदवड, जालना, भुसावळ आदी परिसरातील असंख्य भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आ.चैनसुख संचेती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काजळे पाटील, वाकोडीचे सरपंच शुभम काजळे, पोलीस निरीक्षक गणेश गिरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख व पत्रकार संघाचे गजानन ठोसर, सुरेश संचेती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जाळीचादेव, मेहकर, जालना, कनाशी, वाघोदा, फैजपूर आदी ठिकाणांहून संत-महंत व तपस्विनी माता मोठ्या संख्येने दाखल झाले होते. उपाध्ये कुलभूषण महंत आचार्य भीष्माचार्य बाबा यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली आचार्य अविराज बाबा, जनार्दन बाबा, केशोध्याय बाबा, तपस्विनी कमल अक्का विराट, मनीषाताई विराट व श्याम शास्त्री विराट यांनी अथक परिश्रम घेतले. संतांजी नगरातील नागरिक व पंचक्रोशीतील उपदेशी समाजबांधवांनी कार्यक्रमासाठी अमूल्य सहकार्य केले.कार्यक्रमास गोपाल पंजाबी, ॲड. संजय वानखेडे, डॉ. मोहन तायडे, एकनाथ बोरसे, ज्ञा.ना.हिवाळे, पुरुषोत्तम बोंबटकार, संतोष बोंबटकार, शरद बगाडे, पांडुरंग पाटील, उल्हास संबारे, भास्कर तायडे, संजय धोरण, संजय कातव, शैलेंद्रसिंग राजपूत आदींचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महंत पांगरीकर बाबा आणि महंत विनोद शास्त्री बाबा आंबेकर यांनी प्रभावीपणे सांभाळले. जनार्दन बाबा विराट यांच्या आभारप्रदर्शनानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
