शेतमाल निर्यात संधी कार्यशाळेला उस्फुर्त प्रतिसाद

0
21

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी –

फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (फिओ) व अ‍ॅग्रोवर्ल्डच्यावतीने शेतमाल निर्यात संधी या विषयावर जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी पत्रकार भवन येथे बुधवारी (ता. 7) एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळा शेतकऱ्यांसाठी विनामूल्य होती. आंतरराष्ट्रीय खरेदीदार कसा शोधावा या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेत आमचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला, असा सूर शेतकर्‍यांमध्ये उमटला.

शेतमाल निर्यात संधी या कार्यशाळेत जिल्हाभरातून शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. आत्माचे उपसंचालक कुर्बान तडवी, जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा महाव्यवस्थापक चेतन पाटील, फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे सहाय्यक संचालक अक्षय शहा, कनिष्ठ सहाय्यक संचालक निकेतन भोसले, अ‍ॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आत्माचे उपसंचालक कुर्बान तडवी यांनी कार्यशाळेत कृषी विभागाची निर्यातीतील भुमिका या विषयावर तर फिओचे सहाय्यक संचालक अक्षय शहा यांनी शेमताल निर्यातीत फिओची भुमिका या विषयावर मार्गदर्शन केले. जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर चेतन पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक स्थिती काय? या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रमुख वक्त्यांनी आंतरराष्ट्रीय आयातदार कसे शोधावे, बँक तसेच सरकारची भूमिका कोणत्या शेतमालाला कोणत्या देशात निर्यात केली जाऊ शकते, अशा विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

शेतकर्‍यांना मिळाला आत्मविश्वास
कार्यशाळेच्या शेवटी वक्त्यांनी शेतकर्‍यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देवून त्यांच्या शंकांचे निरसन केले. आतापर्यंत अशा प्रकारच्या कार्यशाळा फक्त मुंबई, पुणे सारख्या शहरात होत होत्या, त्यामुळे जळगाव सारख्या लहान शहर व जिल्ह्यातील शेतकरी शेतीमाल निर्यात करणे, आंतरराष्ट्रीय खरेदीदार कसा शोधावा यासारख्या बाबींपासून कोसोदूर होता. मात्र फिओ व अ‍ॅग्रोवर्ल्डने आयोजित केलेल्या या कार्यशाळेमुळे शेतकर्‍यांना हा विषय समजला आणि या कार्यशाळेत सहभागी झाल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढल्याचे शेतकर्‍यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here