विभागीय क्रीडा संकुलाच्या निर्मिती प्रक्रियेला वेग

0
2

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

मेहरूण येथे प्रस्तावित विभागीय क्रीडा संकुलाचे वास्तूरचनाकार व प्रकल्प सल्लागार (आर्किटेक्चर) म्हणून मुंबईचे शशी प्रभू आणि असोसिएट्स यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीने गुरुवारी, २३ रोजी नाव निश्‍चित केले. लवकरच त्यांना कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील नावलौकिकात भर टाकणारे विभागीय क्रीडा संकुलाची डिझाईन साकारतांना जिल्ह्यातील स्थानिक खेळांना प्रोत्साहन व उत्तेजन मिळेल. अशा क्रीडा सुविधांना प्राधान्य देण्यात यावे. यासाठी स्थानिक उद्योजक, क्रीडा प्रेमी व संघटनांच्या सूचनांचा विचार करण्यात यावा. अशा सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मेहरूण येथे प्रस्तावित विभागीय क्रीडा संकुल, जिल्हा नियोजनामधील कामे व साहित्य संमेलनाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, उद्योजक अशोक जैन, अतुल जैन, बांधकाम व्यावसायिक भरत अमळकर, सार्वजनिक बांधकाम प्रशांत सोनवणे, क्रीडा संघटनाचे पदाधिकारी राजेश जाधव, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रदीप तळवेलकर व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शशी प्रभू आणि असोसिएट्स यांनी सादर केली कल्पना, डिझाईन, योजना व आराखडा सर्वोत्तम ठरल्याने त्यांची निवड झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांचा समावेश आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी दूरध्वनीवरून ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याशी संवाद साधत ही अंतिम निवड जाहीर केली. शासन निर्णयानुसार वास्तूरचनाकार आराखड्याची ४ टक्के फी ठरलेली असते. मात्र, जिल्हाधिकारी यांच्या समितीने मंत्री गुलाबराव पाटील संमतीने शशी प्रभू आणि असोसिएट्स यांच्याशी वाटाघाटी करत ही फी २ टक्क्यांपर्यंत आणली आहे. यामुळे ५ कोटींची बचत झाली आहे.

जिल्ह्यात ८५ हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यात अडचणी येत होत्या. यासाठी गुलाबराव पाटील यांनी पालकमंत्री म्हणून स्वतः कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांंना सूचना दिल्या आणि त्यांच्या पीक विम्यासंदर्भातील तांत्रिक अडचणींचे निराकरण केले. यामुळे आता ७५ हजार शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा भरपाई मिळणार आहे. उर्वरित १० हजार शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटीबध्द आहे, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजनमधील प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश, प्रत्यक्ष सुरू असलेले कामे, मंजूर कामे तसेच २०२४-२५ चा जिल्हा नियोजन आराखडाचा आढावा घेतला. साहित्य संमेलनानच्या अनुषंगाने अमळनेर शहरात करावयाच्या प्रस्तावित विकास कामे व सुविधांविषयी पालकमंत्र्यांनी चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here