खेडशिवापूर टोल नाक्याजवळ थरारक अपघात! टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य ठार, परिसरात हळहळ
साईमत / पुणे
पुणे–सातारा महामार्गावर खेडशिवापूर टोल नाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील नवरा-बायकोचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने आलेल्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
ही घटना दुपारच्या सुमारास घडली असून, टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे रस्त्यावर कोसळले. त्यानंतर टँकरच्या चाकाखाली चिरडले गेल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याचे थरारक दृश्य पाहायला मिळाले.
मृत व्यक्तींची ओळख राजेंद्र बबन मोरे आणि सविता राजेंद्र मोरे अशी झाली असून ते पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे दोघे दुचाकीवरून साताऱ्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.
अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
