‘Solar energy’ : ‘सौरशक्ती’ने उजळले जळगाव परिमंडल, सूर्यघर योजनेत ‘शंभरीपार’

0
16

३५ हजार ग्राहकांची छतावरून वीजनिर्मिती ; १०० मेगावॅट क्षमतेचा टप्पा पार

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत जळगाव परिमंडलाने राज्यात आपली भक्कम ओळख निर्माण केली आहे. परिमंडलातील तब्बल ३५ हजार ग्राहकांनी घरांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवून वीजनिर्मिती सुरू केली आहे. त्यामुळे १२८.१९ मेगावॅट क्षमतेसह नागपूरनंतर शंभरीचा टप्पा पार करणारे जळगाव परिमंडल राज्यातील दुसरेच परिमंडल ठरले आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत जळगाव परिमंडलाने अभूतपूर्व झेप घेतली आहे. परिमंडलातील तब्बल ३५ हजार ग्राहकांनी आपल्या घरांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवून वीजनिर्मिती सुरू केली आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनेचा उद्देश म्हणजे दरमहा तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज उपलब्ध करून देणे तसेच अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध करणे हा आहे. घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच बसवल्यास ग्राहकांना दरमहा साधारण १२० ते ३६० युनिटपर्यंत मोफत वीज मिळते. त्यामुळे जळगाव परिमंडलातील ग्राहक या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.

ग्राहकांसाठी बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय करण्यात आली असून, प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना मेळावे घेऊन मार्गदर्शन केले जात आहे. महावितरणकडून १० किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना ऑनलाईन पोर्टलद्वारे स्वयंचलित मंजुरी दिली जात आहे. नेटमीटरची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते. प्रकल्पांतून निर्माण झालेली वीज ग्राहक दिवसा वापरू शकतात. शिल्लक वीज महावितरणकडे जमा होत आहे. त्याचा लाभ थेट वीजबिलात समायोजित केला जातो. केंद्र सरकारकडून १ किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, २ किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि ३ किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जात आहे. साधारण २५ वर्षे या प्रकल्पांमधून घरगुती वापरासाठी वीज उपलब्ध राहणार असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जळगाव मंडलात २१ हजार ३५४ ग्राहकांचा समावेश

पीएम-सूर्यघर संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प उभारल्यानंतर अनुदान थेट खात्यात मिळते. अधिक माहिती व अर्जासाठी https://www.pmsuryaghar.gov. in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या अक्षय ऊर्जा पोर्टलवर सुविधा उपलब्ध आहे. परिमंडलातील आकडेवारी पाहता, जळगाव मंडलात २१ हजार ३५४ ग्राहकांनी ७९.३७ मेगावॅट, धुळे मंडलात ९ हजार २५४ ग्राहकांनी ३३.९७ मेगावॅट तर नंदुरबार मंडलात ४ हजार ४१९ ग्राहकांनी १४.८५ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले आहेत.

संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईनसह सुलभ

पीएम-सूर्यघर योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांना जवळपास मोफत वीज मिळत आहे. शासनाकडून अनुदानही थेट खात्यात जमा होत आहे. निवासी संकुलांसह सर्व घरगुती ग्राहकांनी अशा योजनेचा लाभ घ्यावा. महावितरणकडून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईनसह सुलभ केली असल्याचे जळगाव महावितरण परिमंडलाचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here