मुक्ताईनगरातील जे. ई. स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांनी जीवनात नेहमी सकारात्मक राहून योग्य मार्गाने सतत कष्ट करावे. तसेच स्वतःमधील गुणदोषांचे अवलोकन करून दोष दूर सारून प्रत्येकाने विवेकाची कास धरावी. आजच्या काळात प्रत्येकाने आत्मबळ वाढवणे अतिशय गरजेचे आहे. पुस्तके म्हणजे ज्ञानाचे दरवाजे आहेत. त्यांचा भरपूर वापर करा, असे प्रतिपादन माजी विद्यार्थिनी, कवयित्री तथा लेखिका शीतल शांताराम पाटील यांनी केले. मुक्ताईनगर येश्रील जे. ई. स्कूलमध्ये रविवारी, २४ ऑगस्ट रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. त्यांनी व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी जे.ई. स्कूल ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक व्ही.एम. चौधरी होते.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांची पाठराखण लाभलेला त्यांचा काव्यसंग्रह ‘मनाच्या बनामधी’मधील कवितांचे सादरीकरण केले. अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात बहिणाबाईंच्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे आयोजक एच.आर. झांबरे, ए. डी. बऱ्हाटे होत्या. यशस्वीतेसाठी कपिल जंगले, सर्वश्री भगत, राणे, दांडगे, पल्लवी राणे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक ए. डी बऱ्हाटे, सूत्रसंचालन एच.आर.झांबरे तर आभार पी.पी.पाटील यांनी मानले.