जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांच्या पुढे; कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
साईमत / जळगाव
गेल्या काही दिवसांपासून जळगावसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. मात्र आता या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करत येलो अलर्ट जारी केला आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. वर्धा, अमरावती, अकोला, वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली आणि ब्रह्मपुरी येथे तीव्र उष्णतेची लाट जाणवली. सोलापूर, परभणी आणि यवतमाळ येथेही तापमान 41 अंशांपेक्षा अधिक नोंदवण्यात आले, तर महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वात कमी 15.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवारनंतर राज्यातील हवामान पुन्हा कोरडे होण्याची शक्यता आहे. मात्र पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा धोका कायम राहणार असल्याने नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव शहर आणि जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी काही भागांत हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे काही प्रमाणात उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी पुढील दोन दिवस हवामान संमिश्र राहणार आहे. 7 आणि 8 मे रोजी तापमानात मोठी घट होण्याची शक्यता नाही. आकाश आंशिक ढगाळ राहणार असून दुपारनंतर हलक्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
वायव्य दिशेकडून मध्यम वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस जळगावकरांना उष्णता, दमट वातावरण आणि अधूनमधून पावसाचा अनुभव येण्याची शक्यता आहे.
