साईमत, फैजपूर : प्रतिनिधी
प्रभू श्रीराम आणि माता शबरी भेटीचे भारतीय संस्कृती व सनातन धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. भक्त व भगवंत यांच्यातील अतुट विश्वास व आस्था तसेच सामाजिक समरसतेचे खूप मोठे प्रामाणिक उदाहरण आहे. संपूर्ण जगासाठी ही भेट कल्याणकारी असा क्षण आहे. अशा पवित्र शबरीधाम याठिकाणी प्रभू रामाचे आगमन पदयात्रेचा शुभारंभ हा वारसा फाटा, पिंपळनेर, ता.साक्री, जि.धुळे येथून फैजपूर येथील सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या सोबत हजारो आदिवासी बांधव श्रीरामाच्या जयघोषात नुकतेच पायी निघाले.
पदयात्रेत शबरीमातेच्या कुळात जन्मलेल्या सर्व आदिवासी बांधव आपल्या पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते. पदयात्रेत शबरी माता मंदिराचे श्री स्वामी अशीमानंद, शिंदखेडा येथील श्री योगी दत्तनाथ महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते सतपंथ परिवाराकडून उपस्थित आदिवासी बंधूंना श्रीराम, लक्ष्मण व शबरी मातेचा फोटो भेट म्हणून देण्यात आला. शबरीधाम येथे उपस्थित सर्व आदिवासी बंधू सोबत उपस्थित संत महात्म्यांनी भोजनाचा एकत्रित आनंद घेतला. शबरीधाम आनंदोत्सवात धर्म जागरण प्रांत संयोजक संदीप लासुरकर, परियोजना प्रमुख डॉ.विकास चौधरी, धर्म जागरण विधी प्रमुख ॲड. कालिदास ठाकूर यांच्यासह पंकज साखरे, दीपक साखरे, समाधान मोरे, परीक्षेत बऱ्हाटे भुसावळ तसेच भिल्ल व आदिवासी समाजातील जळगाव, धुळे, नंदुरबार, डांग जिल्ह्यातील असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.
महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज निघाले अयोध्येला
फैजपूर येथील सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज १४ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येसाठी रवाना झाले. प्रभू श्रीराम जन्मभूमी पूजन सोहळ्याला जाताना महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी खान्देशातील प्रमुख तीर्थावरील माती व प्रमुख नद्यांमधील जल घेऊन प्रस्थान केले होते. आता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाताना आदिवासी बांधवांसोबत शबरीधाम येथे पायी प्रवास करत शबरी मातेचे दर्शन घेऊन प्रेमाची बोरे श्रीरामांना भेट देण्यासाठी अयोध्येला निघाले आहे, हा क्षण उपस्थित सर्वांसाठी अत्यंत अनमोल असा होता.