साईमत न्यूज नेटवर्क –
देश ‘विकसित राष्ट्रा’कडे वाटचाल करत असल्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. अकोला जिल्हा सर्वोपचार शासकीय रुग्णालयात घडलेल्या एका घटनेने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेच्या पतीला अचानक ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांना तातडीने अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाची गंभीर अवस्था लक्षात घेता त्याला तातडीने स्ट्रेचरची गरज होती. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे वेळेवर स्ट्रेचर उपलब्ध न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
परिस्थिती अत्यंत गंभीर होत असताना, रुग्णाची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून त्या पत्नीने कोणतीही मदत न मिळाल्याने स्वतःच पुढाकार घेतला. स्वतःच्या पाठीवर अचेतन अवस्थेतील पतीला उचलून तिने रुग्णालय परिसरात डॉक्टर, नर्स आणि आयसीयूचा शोध घेत धावपळ केल्याचे सांगितले जाते. या हृदयद्रावक प्रसंगाने उपस्थितांचे मन हेलावून टाकले.
या घटनेचा व्हिडिओ रुग्णालयातीलच एका व्यक्तीने मोबाईलमध्ये चित्रित करून सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर शासकीय आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि अपुऱ्या सुविधांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
कोट्यवधी रुपयांचा निधी मिळूनही रुग्णालयात मूलभूत सुविधा, वेळेवर स्ट्रेचर उपलब्धता आणि तत्काळ सेवा न मिळणे यावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यापूर्वीही राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांची कमतरता आणि अपुऱ्या सुविधा यामुळे रुग्णांचे हाल झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अकोल्यातील ही घटना व्यवस्थेतील गंभीर दुरवस्थेचे प्रतीक ठरत आहे.
या प्रकारानंतर नागरिक, सामाजिक संघटना आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासनावर तीव्र टीका केली जात आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही पुढे येत आहे. आता या प्रकरणी आरोग्य विभाग आणि वरिष्ठ प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
