पुण्यातील शिवसेना नेत्याला शिंदेंसेनेची गळ…..

0
3

साईमत लाईव्ह 

मुंबई : प्रतिनिधी

शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांच्या ताकदीवर शिंदे सरकार भक्कम करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे आपली नजर वळवली असून, मुंबईपाठोपाठ पुण्यातील कडवट शिवसैनिक माजी नगरसेवक नाना भानगिरेंना गळाला लावण्याच्या हालचाली शिंदेंनी चालविल्या आहेत. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून भानगिरे हे मुंबईत तळ ठोकून आहेत आणि शिंदे थांबलेल्या ताज प्रेसिडेंटमध्येच त्यांचा मुक्काम असल्याचे सांगण्यात येत आहे. भानगिरे यांच्यासारख्या पुण्यातील मोठ्या नेत्याला फोडून महापालिका निवडणुकांआधी शिंदे हे शिवसेनेला नवे धक्के देण्याच्या तयारीत आहेत.

पुणे महापालिकेत प्रशासन आल्यानंतर निधी अडविल्याची तक्रार करीत भानगिरे यांनी चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानंतर शिंदे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमारांशी बोलून निधी देण्याचा आदेश दिला.त्यानंतर पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमारांनीही तब्बल दीडशेकोटी पेक्षा अधिक रुपयांचा निधी दिला. त्यातून शिंदे आणि भानगिरे यांच्यातील जवळीक दिसून आली. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आपल्या शब्दाला ‘वजन’ असल्याने भानगिरे भलतेच खूष आहेत. त्यामुळे भानगिरे हे शिंदेंकडे आकर्षित होऊन, त्यांच्या गटात दाखल होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पुणे महापालिकेत शिवसेनेच्या तिकिटावर तीनवेळा नगरसेवक झालेल्या भानगिरे यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. हडपसर विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याची भानगिरें यांची इच्छा आहे. ती पूर्ण व्हावी म्हणून विधानसभेच्या २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भानगिरेंनी नशीब अजमावले होते.  त्यानंतरही  महापालिका आणि पुण्यातील शिवसेनेवर पकड ठेवण्यासाठी भानगिरे हे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या ‘गुड बुक’ मध्ये राहिले. याच काळात भानगिरे यांनी शिंदेंसोबतची जवळीक वाढवून, मुंबईत प्रस्थ वाढविण्याचे जोरदार प्रयत्न केले. त्यात ते यशस्वीही झाले. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांआधी शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवल्यानंतर भानगिरे हे काही दिवस मुंबईत शिंदेंच्या मदतीला होते. या संघर्षात शिंदेंनी दिलेली जबाबदारी पार पाडून भानगिरेंनी शिंदेंचे मन जिंकले. त्यानंतर मात्र, शिंदे यांनी बंड केल्यानंतर भानगिरे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे दाखवून दिले. दरम्यान पुण्यात अहिरांच्या उपस्थित झालेल्या बैठकांना भानगिरेंनी हजेरी लावली. परंतु, त्यांच्या मनात शिंदेचेही आकर्षण कायम असल्याचे लपून राहात नव्हते. त्यामुळे भानगिरेंची भूमिका काय, यावर पुण्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाल्या. शेवटी शिंदेंचे बंड यशस्वी झाले; ते मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीतही बसले. तेव्हाच, पुणे शहराच्या विकासाचा मुद्दा पुढे करून भानगिरेंनी शिंदेंकडे निधीची मागणी केली. त्यानंतरच्या काही मिनिटांतच शिंदेंनी विक्रम कुमारांशी चर्चा आणि दीडशे कोटींच्या निधीची घोषणा झाली. यानिमित्ताने भानगिरे यांनी महापालिकेत पुन्हा दबदबा वाढविला. त्यावरून शिंदेंच्या आभारासाठी भानगिरे मुंबईत दाखल झाले. तेव्हाच, त्यांना आपल्या गोटात ठेवण्यासाठी शिंदेंनी गळ घातल्याचे सांगण्यात आले. त्यावरून भानगिरेंनी अद्याप आपला पत्ता उघड केला नाही. मात्र, ते पुढच्या काही दिवसांत या गटात दाखल होऊन, पुण्यात शिंदे गटाचे नेतृत्त्व करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here