साईमत जळगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या जळगाव जिल्ह्यातील संघटनात्मक रचनेत महत्त्वाचा बदल करण्यात आला असून नंदू आप्पा पाटील यांची जिल्हाप्रमुखपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात पक्षाच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा आणि गती मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ संभाजी शिंदे यांच्या आदेशानुसार, तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण जबाबदारी नंदू आप्पा पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी भोर यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीनंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.नंदू आप्पा पाटील हे जळगाव जिल्ह्यातील एक सक्रिय आणि जनसंपर्कात तत्पर समाजसेवक म्हणून ओळखले जातात. वाहतूक क्षेत्र, कामगार संघटना तसेच शिवसेनेच्या विविध संघटनात्मक उपक्रमांमध्ये त्यांनी दीर्घकाळ कार्य केले आहे.
स्थानिक पातळीवरील प्रश्न, कामगारांचे मुद्दे आणि वाहतूक क्षेत्रातील अडचणी यावर त्यांनी सातत्याने आवाज उठवला असून, त्यामुळे ते जनतेमध्ये विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
त्यांचे सामाजिक कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून, वाहतूक क्षेत्रातील समस्या, कामगारांचे हक्क आणि जनहिताचे मुद्दे सोडवण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या या कार्यशैलीमुळे जिल्ह्यात विविध घटकांमध्ये त्यांची मजबूत प्रतिमा निर्माण झाली आहे.नंदू आप्पा पाटील हे कुस्ती क्षेत्रातील मान्यवर आणि कुस्ती समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील यांचे बंधू आहेत. त्यांच्या कुटुंबाचा सामाजिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात मोठा प्रभाव असल्याने त्यांच्या नेतृत्वाला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या नियुक्तीनंतर जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून आगामी काळात वाहतूक क्षेत्रातील समस्या सोडवणे, तसेच संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नंदू आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय कामकाज होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
