शिवसेना ठाकरे गटाचे खा.संजय राऊतांचा जोरदार हल्ला
साईमत/मुंबई/प्रतिनिधी :
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जागावाटपावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप आता शिगेला पोहोचले आहेत. शिवसेनेच्या (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “आतापर्यंत मुंबईत शिवसेना भाजपला जागा देत होती, पण आज शिंदेंना जागांसाठी अमित शहांच्या दारात जावे लागत आहे,” अशा शब्दांत राऊत यांनी शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले की, गेल्या ६० वर्षांच्या इतिहासात शिवसेनेला जागा मागण्यासाठी कधीही कोणाच्या दारात जावे लागले नव्हते. शिवसेना नेहमीच ‘मोठ्या भावाच्या’ भूमिकेत राहिली आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी भाजपसमोर पूर्णपणे लोटांगण घातले असून भाजप जे फेकेल, त्या जागांवर त्यांना समाधान मानावं लागत आहे. हे केवळ धक्कादायक नसून लज्जास्पद आहे, असा टोला त्यांनी लगावला.
शिंदे हे भाजपचे गुलाम झाले आहेत. त्यांनी आता स्वतःला शिवसेना पक्ष म्हणवून घेणे सोडून दिले पाहिजे, कारण ती आता अमित शहांची शिवसेना झाली आहे. ज्या पद्धतीने ते दिल्लीश्वरांच्या दारात जागांसाठी रांगत आहेत, त्यावरून ‘शिवसेनेचे भारतीय जनता पार्टीकरण’ झाले आहे हे स्पष्ट दिसते. स्वाभिमानी मराठी माणसाची अशी लाचारी पाहून आपल्याला वाईट वाटते, असेही राऊत यावेळी म्हणाले.
संजय राऊत यांनी २०१७ मधील महापालिका निवडणुकीचा दाखला दिला. “२०१७ मध्ये जेव्हा भाजपने जागावाटपात अडेलतट्टू भूमिका घेतली होती, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानाने बाजूला होऊन स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही तेव्हा अमित शहा किंवा मोदींच्या दारात जाऊन बसलो नव्हतो. आम्ही स्वाभिमानी आहोत आणि आजही स्वाभिमानानेच लढत आहोत. मात्र, शिंदेंनी गुडघे टेकले आहेत,” असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.
भाजप-शिवसेना युतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, मुंबईत मोदींनी प्रचाराला येण्याचे कारण काय? त्यांनी कोणालाही प्रचाराला आणले तरी मुंबईत फक्त ‘ठाकरे बंधूच’ जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटी, अमित शहा आणि त्यांचे बिल्डर मित्र मुंबई गिळण्याचा प्रयत्न करत असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. “मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ती वाचवण्यासाठी आमची लढाई सुरू आहे. मुंबईत केवळ ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ हाच नारा गुंजेल,” असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
