शिंदे गटातील खासदाराला घरातूनच आव्हान ; धाकटा भाऊ उद्धव ठाकरेंसोबत…

0
4

बुलडाणा : प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासह तब्बल ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडाळीनंतर प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा वाढदिवस राज्यभरात साजरा करण्यात आला. मात्र बुलढाणा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आणि खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav)यांच्यासह दोन आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. परंतु जिल्ह्यात एवढी मोठी उलथापालथ झाली असताना खासदार जाधव यांचे धाकटेबंधू, माजी नगराध्यक्ष संजय जाधव(Sanjay Jadhav) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांचा वाढदिवस सगळीकडे फलक लाऊन आणि वृत्तपत्रात जाहिरात देऊन धुमधडाक्यात साजरा केला. त्यामुळे ही घडामोड प्रताप जाधव यांना हादरा देणारी समजायची की गनिमी कावा खेळून दोन्ही सेना आपल्या कुटुंबात ठेवायची? अशी चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे. तसेच संजय जाधव यांनी खासदार असलेल्या भावाविरोधातच दंड थोपटले तर नाही ना? अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील दोन शिवसेनेचे आमदार शिंदे गटात सामील झाले. त्या पाठोपाठ 12 खासदारांनी देखील शिंदे गटात समावेश केला. त्यात बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हे अग्रस्थानी होते. त्यानंतर मात्र बुलडाणा जिल्ह्यात शिवसेनेला मोठे भगदाड पडणार असा अंदाज वर्तवण्यात येत होता. परंतु काही दिवसातच इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही उद्धव ठाकरे सोबतच आहोत आणि त्यांच्या सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने शिंदे गटातील पदाधिकारी तोंडघशी पडले होते.

त्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांनी मेहकर, चिखली, सिंदखेड राजा या ठिकाणी बैठका घेऊन आपली पुढील भूमिका स्पष्ट केली होती. शिवसैनिकांची मनधरणी करण्याचाही त्यांनी प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस झाल्याने त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या. त्यामध्ये मेहकरचे शिवसेनेचे दोन वेळा नगराध्यक्ष राहिलेले आणि खासदार प्रतापराव जाधव यांचे धाकटे बंधू संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना एका वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि शहरात फलक लावून शुभेच्छा दिल्या आहेत. या जाहिरातीमध्ये जिल्हा शिवसेनाप्रमुख बळीराम मापारी यांचाही फोटो होता. त्यामुळे खासदाराचे बंधूच त्यांच्यासोबत नसल्याने संजय जाधव यांनी प्रतापराव जाधव यांना घरचा आहेर दिल्याची जिल्ह्यात सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here