अजित पवारांचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने शरद पवारांनी उचलले ठोस पाऊल

0
2

नागपूर : वृत्तसंस्था

अजित पवार आमचे नेते आहेत,असे मी बोललो नव्हतो तसेच अजित पवारांना पुन्हा संधी नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. यावर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे. अजित पवार यांचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने शरद पवार यांनी पाऊल उचलले आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शरद पवार काय म्हणाले?
“अजित पवार आमचे नेते आहेत, असे मी बोललोच नव्हतो. अजित पवार यांना पुन्हा संधी नाही. एक दिवशी दोन व्यक्तींचा पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यात आमचे एक सहकारी सहभागी होते. त्यावेळी आम्ही एक निर्णय घेतला होता. पण, त्यानंतर जे काही झालं, ते योग्य नाही. एखाद्या भूमिकेनंतर चुकीत बदल केला, तर ती संधी झाली. पहाटेच्या शपथविधीनंतर आम्ही त्यांना संधी दिली. आता परत संधी मागायची नसते आणि मागितली तर द्यायची नसते,” असे शरद पवार यांनी म्हटले.
यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “शरद पवार यांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात येतात. तरी, शरद पवार जिद्दीने मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांचे कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने शरद पवार यांनी पाऊल उचलले आहे. शरद पवार यांचे ते पाऊल नक्की यशस्वी होणार आहे.”
“राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या २ खासदार आणि ९ आमदारांवर कारवाईची सुरुवात झाली आहे. शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे,” असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here