साईबाबा मंदिर परिसरातील बांधकामादरम्यान दुर्घटना निष्काळजीपणाची चौकशी करण्याची मागणी
साईमत/पाळधी/ प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे सुरू असलेल्या पर्यटन विकास प्रकल्पात सोमवारी भीषण दुर्घटना घडली. साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या बांधकामादरम्यान अचानक निर्माणाधीन स्लॅब कोसळल्याने सात कामगार जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटन विभागाकडून पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत गेल्या काही महिन्यांपासून विविध बांधकामांची कामे सुरू आहेत. सोमवारी कामगार नेहमीप्रमाणे कामात व्यस्त असताना अचानक बांधकामाचा साचा आणि स्लॅब कोसळला. क्षणातच मोठा आवाज झाला आणि परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या दुर्घटनेत सात कामगार जखमी झाले. उपस्थितांनी तातडीने धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी दोन कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, स्लॅब कोसळण्यामागचे नेमके कारण काय, बांधकाम प्रक्रियेत कुठे निष्काळजीपणा झाला का, याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. घटनेनंतर काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बचावकार्यात सहभागी होत जखमी कामगारांची विचारपूस केली तसेच त्यांना तातडीने योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला.
