मनपाने अतिक्रमणावर केली कारवाई
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
शहरातील नवीन जिल्हा न्यायालयाच्या उभारणीसाठी शाहू नगरातील ट्राफिक गार्डन परिसरातील सुमारे सात एकर जागा मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाने शुक्रवारी (२० फेब्रुवारी) मोकळी केली. कारवाईदरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, परंतु पोलीस बंदोबस्त आणि मनपा प्रशासनाच्या समन्वयामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.
जिल्हा न्यायालयाची सध्याची जागा अपुरी पडत असल्याने प्रशासनाने नव्या न्यायालयासाठी ट्राफिक गार्डन परिसरातील ही जागा निश्चित केली होती. या जागेवर अनेक अतिक्रमक – खाद्यपदार्थ विक्रेते, हातगाडी चालक आणि गॅरेज व्यवसायिक – आपला व्यवसाय सुरू ठेवत होते. न्यायालय प्रशासनाने यापूर्वीच जागा अधिकृतपणे ताब्यात घेतली होती आणि “अतिक्रमण निषिद्ध” अशा सूचना फलकावर लावण्यात आल्या होत्या, परंतु काही व्यावसायिकांनी पुन्हा अतिक्रमण केले.
अधीक्षक संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाने सर्व अतिक्रमण हटवून परिसर मोकळा केला. काही अतिक्रमकांनी कारवाईला विरोध केला, मात्र पोलीस बंदोबस्तामुळे कोणतीही गंभीर घटना टळली.
प्रशासनाच्या माहितीनुसार, भविष्यात या जागेवर अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन जिल्हा न्यायालयाची इमारत उभारली जाणार आहे. यामुळे शहरातील न्यायव्यवस्थेच्या कामकाजाला गती मिळणार असून नागरिकांना न्याय मिळविण्यात सुविधा वाढणार आहेत.
या कारवाईने न्यायालयाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे, तसेच भविष्यात अतिक्रमण टाळण्यासाठी जागेवर सतत देखरेख ठेवली जाणार आहे.
