साईमत, जळगाव, पुणे : प्रतिनिधी
राज्यात १७ ऑगस्टपासून महसूल खात्याअंतर्गत येणाऱ्या तलाठी पदाच्या चार हजार ६४४ जागांसाठी एका खासगी यंत्रणेच्या माध्यमातून तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी राज्यभरातून १० लाख ४१ हजार अर्ज आलेले आहेत. या परीक्षेत सोमवारी जळगाव, धुळे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला आदी जिल्ह्यांत नियोजित केंद्रांवर ऑनलाईन परीक्षेचं मुख्य सर्व्हर बंद पडल्याने परीक्षा तब्बल दोन तास उशीरा झाली. त्यामुळे इतर जिल्ह्यातून आलेल्या परीक्षार्थींना ताटकळत बसाव्ो लागले.खूप जणांची तारंबळ उडाली.
परीक्षा तब्बल दोन तास पुढे ढकलण्यात आल्यामुळे बाहेर जिल्ह्यातून आलेला विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. जळगाव शहरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी सकाळी नऊ वाजता तलाठी भरतीचा पहिला पेपर होता. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्यामुळे हा पेपर साडेअकरा वाजता सुरू झाला. त्यामुळे परीक्षेचे व्ोळापत्रक कोलमडले . पुढील सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा दुपारी साडेबारा ऐवजी दुपारी अडीच वाजता सुरू झाली.
दरम्यान, तलाठी भरती परीक्षेसाठी नंदुरबार, धुळे, जळगाव-मध्य प्रदेश सीमेवरील आणि अन्य जिल्ह्यातून विद्यार्थी हे व्ोळेवर दाखल झाले होते. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याचे अडचण सांगून पेपर उशिरा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. सर्व्हर डाऊन मुळे तब्बल दोन तास ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे रात्री साडेआठ वाजेपर्यंत या परीक्षा सुरू होत्या. त्यामुळे परीक्षा देऊन घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कुठलीही बसण्याची व्यवस्था नसल्याने उमेदवारांनी प्रचंड रोष व्यक्त केला. तसेच आमचा जो व्ोळ वाया गेला याला जबाबदार कोण असाही प्रश्न या ठिकाणी तरुण तरुणी तसेच परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांनी उपस्थित केला.
एका विवाहिता तलाठी भरती परीक्षेसाठी येत असताना रस्त्यात अपघात झाला. मात्र, यानंतरही अपघातग्रस्त चारचाकी जागेवरच सोडून दुसऱ्याची दुचाकी घेऊन त्यांनी व्ोळेत परीक्षाकेंद्र गाठले. मात्र आता त्यांना या ठिकाणी तब्बल दोन तास उशिराने पेपर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आल्याने त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
आमदार रोहित पवारांची सरकार सडकून टिका
तलाठी भरतीसाठी हजार रुपये शुल्क वसुली करूनही संबंधित कंपनीला परीक्षा सुरळीत घेता येत नाही. कधी पेपरफुटी तर कधी सर्व्हर डाऊन, ही अडथळ्यांची शर्यत परिक्षार्थींना पार पाडावी लागत आहे. सकाळी ८ वाजता रजिस्ट्रेशन सुरू होणे अपेक्षित असताना सर्व्हर डाऊन झाल्याने संपूर्ण राज्यातील परीक्षा खोळंबली. या सरकारला काही गांभीर्य आहे की नाही? की यात काही काळंबेरं आहे, असा सवाल आमदार रोहीत पवार यांनी उपस्थित केला.राज्यभरातून सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.
बच्चू कडु करणार कंपनीवर कारवाईची मागणी
अमरावतीतही असाच प्रकार घडला. याबाबत बच्चू कडू म्हणाले की, या संदर्भात मी ३० ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. गोंधळ करणाऱ्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे, नाहीतर सरकार विरोधात उभे राहू असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले. सहा महिन्यानंतर या सर्व परीक्षा केरळच्या धरतीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच घेण्यात याव्या तसेत या सोबतच कोणत्याही होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून वर्षाकाठी फक्त हजार रुपये फी घेण्यात यावी अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केली.