Sensitivity That Brings : पुरग्रस्तांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवणारी संवेदनशीलता

0
11

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेसह एरंडोल रोटरी क्लबतर्फे मदतीचा हात

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील अंजनी नदीला आलेल्या अचानक पुरामुळे म्हसावद नाक्याजवळील कुंभारवाडा आणि फकीरवाडा परिसरातील अनेक परिवाराला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले. घरात पाणी शिरल्यामुळे वस्तूंचे, घरगुती साहित्याचे तसेच व्यवसायिक साधनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा भीषण परिस्थितीत जळगाव येथील ‘नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था’ आणि ‘रोटरी क्लब एरंडोल’ यांनी पुढाकार घेत संवेदनशील मदतीचा हात पुढे केला.
ह्या संस्थांच्या माध्यमातून शनिवारी, ४ ऑक्टोबर २०२५ रोजी पूरग्रस्त नागरिकांना धान्य, डाळ, तेल, ब्लँकेट आदी जीवनावश्यक वस्तूंचे किटचे घरपोच वाटप केले. यासोबतच संस्थेच्या सदस्यांनी पूरग्रस्तांना मानसिक आधार देत धीर दिला. शासकीय मदत पोहोचण्याआधीच सामाजिक संस्थांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता नागरिकांनी कौतुकाने व्यक्त केली.

मदतकार्यावेळी नारीशक्ती संस्थेच्या अध्यक्ष मनीषा पाटील, वंदना मंडावरे, नूतन तासखेडकर, किमया पाटील, हर्षा गुजराती, विभावरी पाटील यांच्यासह रोटरी क्लब एरंडोलचे चार्टर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉ. नरेंद्र ठाकूर उपस्थित होते. उपक्रमासाठी राजेंद्र चौधरी, देवा चौधरी, विक्की चौधरी, पवन चोधरी, मुश्ताक खाटीक, ज्योती राणे, नीता वानखेडकर, अ‍ॅड. सीमा जाधव, नेहा जगताप, आशा मौर्य, माधुरी टोके, माधुरी शिंपी यांच्यासह कुंभारवाडा मित्र मंडळाचे सहकार्य लाभले.

संस्थेच्या प्रतिनिधींनी दिला ‘त्या’ आजीला मानसिक धीर

जळगाव जिल्ह्याचे संवेदनशील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अलीकडेच एरंडोल येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी एका वृद्ध आजीशी संवाद साधत तिच्या ज्येष्ठ नागरिक पेन्शन संदर्भात सकारात्मक कार्यवाही केली होती. त्या आजीला नारीशक्ती संस्थेच्या सदस्यांनी विशेष भेट देऊन आपुलकीने चौकशी करुन मदतीचा हात दिला. आगामी काळातही आवश्यक ती मदत करण्याचे संस्थेच्या प्रतिनिधींनी आश्वासन देत तिला मानसिक धीर दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here