मुक्ताईनगरातील खडसे महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र

0
24

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

येथील खडसे महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षातर्फे शिवाजी विद्यालय, कुऱ्हा येथे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.बी.पाटील होते. प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक डॉ. जी. एस.चव्हाण, रवींद्र पाटील, काकडे उपस्थित होते.

प्रमुख मार्गदर्शक डॉ.जी. एस. चव्हाण यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयावर सविस्तर माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे केंद्र सरकारने स्विकारले आहे. ते येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी म्हणजेच २०२४-२५ पासून महाविद्यालयांना लागू करण्यात येणार आहे. त्यासाठीचा अभ्यासक्रम तयार झालेला आहे. यापूर्वी दहावी, बारावी व तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम होता. आताच्या शैक्षणिक धोरणात अगदी के.जी.पासून तर पी.जी.पर्यंतचा विचार केलेला आहे. आता विद्यार्थी तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून पदविका व चार वर्षांत पदवी प्राप्त करतील. त्यासह ऑनर्स व पदवी प्राप्तसह भविष्यात संशोधन करण्यास चालना व मदत होईल. विद्यार्थ्यांना आता क्रेडिट गोळा करावे लागतील. ते क्रेडिट विद्यार्थ्यांच्या अकॅडमीक बँक ऑफ क्रेडिटमध्ये जमा होतील. त्याला अभ्यासासह इतर उपक्रम, इंटर्नशिप, प्रकल्प पूर्ण करावे लागतील. एक विषय मेजर घेऊन दुसरा विषय मायनर म्हणून घेता येईल. तसेच कला शाखेतील विद्यार्थी कौशल्यावर आधारित एक विषय कोणत्याही शाखेचा वरीलपैकी कोणत्याही शाखेतून निवड करुन अभ्यासू शकेल.

अध्यक्षीय मार्गदर्शनात एस.बी.पाटील यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत असल्याने जे विद्यार्थी आता बारावी वर्गात शिकत आहेत. पुढीलवर्षी प्रथम वर्ष कला विभागात प्रवेश घेतील. सध्या पदवीसाठी प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन केले आहे. तसेच उपस्थित पालकांनीही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजून घेणे गरजेचे आहे. म्हणून पालकांचा सहभागही महत्त्वाचा असल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्रा. डॉ.पी. एस. प्रेमसागर तर सूत्रसंचालन धुंदले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here