भुसावळला भोळे महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियानाला प्रारंभ

0
22

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय भुसावळ विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा आयोजित आत्मनिर्भर युवती अभियान कार्यक्रम १८ जानेवारी २०२४ पासून महाविद्यालयात सुरू झाले. त्या अंतर्गत प्रथम सत्रात गुलशन कुमार ब्रांच मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र, भुसावळ यांनी बँक व्यवहारासंबंधी युवतींमध्ये जनजागृती केली. त्यामध्ये विविध खाती आरटीजीएस एनईएफटी युपीआय यासंबंधीची विस्तृत माहिती दिली. तसेच हॅकर्स कशा पद्धतीने खातेधारकांची फसवणूक करतात व ती रोखण्यासाठी ग्राहकांनी काय काळजी घ्यावी याची माहिती दिली.

दुसऱ्या सत्रात शैक्षिक आगाज व पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नाना शंकर पाटील यांनी कृषी संदर्भातील विविध योजनांची माहिती दिली. योग्य वेळी मार्केटिंगच्या संधी बघून असे उद्योग उभे करून उद्योजिका व्हा. शासनाने अनेक योजना कृषी आधारित महिलांसाठी सुरु केलेल्या आहेत. ज्यात केंद्रशासन ६० टक्के तर राज्य शासन ४० टक्के अनुदान देते. युवती व महिलांसाठी शासनाने आत्मनिर्भर सारख्या योजना राबवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. कृषीच्या योजनेसाठी ५ लाख ते २० लाख कर्ज केवळ ४ टक्के व्याजाने दिले जाते. ज्याद्वारे युवतींना कसे आत्मनिर्भर होता येईल, त्याची माहिती सांगितली. तसेच वृक्षारोपणाचे महत्त्व सांगून कचरा व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी आत्मनिर्भर युवती अभियाना अंतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. युवतींनी अभियानामध्ये उत्साहाने सामील होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी डॉ.ए.आर.सावळे, डॉ.जे.पी.सरोदे, डॉ.ए.के.पाटील, प्रा.एस.एन.चौधरी, गायत्री नेमाडे, सुशीला भट उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.संगीता धर्माधिकारी, सूत्रसंचालन डॉ.माधुरी पाटील तर आभार प्रा.आर.डी.भोळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here