साईमत, शिरपूर, प्रतिनिधी
तालुक्यातील भाटपुरा गावासारख्या ग्रामीण भागातून आयएस पदावर एक युवक पोहोचला. हा फक्त भाटपुऱ्याचा नव्हे तर तालुक्याचा गौरव आहे आणि खऱ्या अर्थाने हा गौरव शिक्षणामुळे शक्य झाला आहे. त्यामुळे आजच्या काळात शिक्षणाशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही याचे उत्तम उदाहरण आहे, असे प्रतिपादन आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले. ते शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथे आयएएस कॅडरपदी नियुक्ती झालेले भूमिपुत्र डॉ.प्रवीणकुमार पीतांबर देवरे याां गौरव सोहळ्याप्रसंगी बोलत होते. देवरे यांचा भाटपुरा ग्रामस्थांच्या वतीने हृदय स्पंदन गौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला होता.
यावेळी आ.काशीराम पावरा,चोपड्याच्या आ.लताताई सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, निवृत्त पोलीस आयुक्त छगन वाकडे, गोविंदराव जाधव, मार्केट कमिटीचे सभापती के.डी. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रूपसिंग चौधरी, नरेंद्र जमादार, पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक पितांबर देवरे, मुंबई येथील विक्रीकर उपायुक्त रवींद्र देवरे, महाबीजचे कृषी अधिकारी संजय देवरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमरीशभाई पटेल म्हणाले, आजच्या जगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आपण बघतो घरातून एक माणूस शिक्षित झाला तर पूर्ण परिवार शिक्षित होतो.
परिसर शिक्षित झाला तर पूर्ण गाव शिक्षित होते. त्यामुळे आपल्यासारख्या मागास तालुक्यात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि यासाठी आपण शिक्षण व पाण्याला जास्त महत्त्व देत काम करीत आहोत.आज महाराष्ट्रात पाण्याची कमतरता आहे. मात्र आपल्या तालुक्यात 350 बंधारे बांधल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना आज पाण्याची गरज नाही. आजच्या आपल्या पाण्यासाठी केलेल्या कामामुळे 25 वर्ष आपल्याला पाणी कमी पडणार नाही. मात्र तरीही आपण सर्वांनी पाणी जपून वापरले पाहिजे. यासोबत आपण सर्वांनी शेती अथवा कोणताही काम करीत असताना मुलांच्या शिक्षणावर जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे.आज आपल्या गावाचे तसेच तालुक्याचे नाव फक्त शिक्षणामुळेच मोठे होत आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी आयएएस डॉ. प्रवीणकुमार देवरे सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले,शिक्षणाशिवाय पर्याय नाही, असे असले तरी मात्र शिक्षणासाठी संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही. संघर्षाशिवाय माणसाच्या जीवनात यश येऊ शकत नाही. आज मी विविध ठिकाणी काम करीत असताना हे जाणीवपूर्वक लक्षात येते. माझ्या विभागाकडून वाडा-वस्ती सुधारण्याचे काम होते. तालुक्यासाठी आमदार भाईंनी यासाठी कोणतेही काम सांगितले तरी मी माझ्या मातृभूमीसाठी काही केले असे समजेल. शिक्षण सुरू असताना कधीही वाटले नव्हते की, मी या पदापर्यंत येईल. मात्र माझे ध्येय ठरलेले होते. मला मार्गदर्शन चांगले मिळाले.
यासाठी गावातील नवीन पिढीसाठी काहीतरी करावे, या भावनेतून आम्ही सध्या काम करीत आहोत. आणि यातूनच भाटपुऱ्यात भाटपुरा विकास मंचाच्या नावानं आम्ही अभ्यासिका सुरू केली आहे. तरुण नवीन पिढीने शिक्षणासाठी संघर्ष व मेहनत केली तर यश मिळेलच याची खात्री मला माझ्या जीवनात मिळाली आहे. असेही ते म्हणाले.
यावेळी आयएएस डॉ.प्रवीणकुमार देवरे यांची गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. देवरे दाम्पत्याची बग्गीतून मिरवणुक काढण्यात आली. गावकरी मोठ्या आनंदाने त्यांच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. सदर गौरव सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ.राधेश्याम चौधरी यांनी तर सूत्रसंचालन प्रशांत चौधरी यांनी व आभार किरण बागुल यांनी मानले.