साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
पोळून काढणाऱ्या कडाक्याच्या उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी व पाण्याची तहान भागविण्यासाठी पक्ष्यांची मात्र अविरत धडपड सुरु असते. या धडपडीला सुसह्य करुन त्यांच्या जिवाला थोडासा गारवा देण्यासाठी युवा नेतृत्व व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाळधी येथील जीपीएस ग्रुपमार्फत ५०० बडगे (मातीची भांडी) वाटप करण्यात आले. केवळ साहित्य लावले नाही तर त्यामध्ये महिनाभर पाणी व धान्य ठेवण्याची जबाबदारीही तरुणाईने समर्थपणे उचलून पक्ष्यांचे प्राण वाचवावे व पक्ष्यांसाठीच्या जाणिवेचा हा ओलावा आणखी वाढविण्यासाठी सर्वांकडूनच बळ मिळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रतापराव पाटील यांनी केले. ते पाळधी येथे शुक्रवारी, ५ एप्रिल रोजी बाजाराचे औचित्य साधून ५०० बडगे वाटपप्रसंगी बोलत होते.
उन्हाच्या प्रखर झळांमध्ये पक्ष्यांची जगण्यासाठीची ससेहोलपट थांबविण्यासाठीच प्रतापराव पाटील आणि जीपीएस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी बडगेचा वापर कसा करावा याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
पक्ष्यांचा जीव वाचवा…
तीव्र उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांसह पशुपक्षी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. त्यांच्या तृष्णातृप्तीसाठी नागरिकांनी आपल्या घराबाहेर, छत, संरक्षण भिंती, भिंती तथा वृक्षांवर बडगे (मातीच्या भांड्यात ठेवून) पक्ष्यांसाठी पिण्यासाठी पाणी ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था राष्ट्रीय कर्तव्य समजून बजावल्यास पक्ष्यांच्या जीवाचे रक्षण करता येईल. तेव्हा प्रत्येकानेच या कार्यात पुढाकार घेवून राष्ट्रीय संपत्ती जोपासण्यासाठी माणुसकीचा वाटा उचलावा, असे आवाहन जीपीएस ग्रुपमार्फत केले आहे. याप्रसंगी पाळधीचे सरपंच विजयसिंग पाटील, उपसरपंच राहुल ठाकरे, ग्रा.पं. सदस्यांसह जीपीएस मित्र परिवाराचे सर्व सदस्य, पक्षी प्रेमी उपस्थित होते.