साईमत, जळगाव : प्रतिनिधी
येथील गांधी रिसर्च सेंटर जैन व्हॅली येथे यशदा, पुणे अंतर्गत सरपंचांसाठी नुकतेच तीन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणात ४० गावांच्या सरपंचांनी सहभाग घेतला. सरपंचांनी विकास आराखडा लोकसहभागाने तयार करावा आणि काळजीपूर्वक नियोजन करावे, तसेच ग्रामपंचायतीच्या आराखड्यात मनरेगाच्या २६४ कामाची सांगड घालावी, असे यशदाचे राज्य प्रशिक्षक भूषण लाडवंजारी यांनी सांगितले. तसेच जलसमृध्द गाव, जलजीवन मिशन, स्वच्छ व हरित गाव कसे करावे, याविषयी मार्गदर्शन केले.
यशदामार्फत २०१३ पासून राज्य प्रशिक्षक म्हणून निवडीपासून भूषण लाडवंजारी यांनी २० हजारापेक्षा जास्त पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना विविध विषयावर प्रशिक्षण दिले आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षण देताना ते केंद्र व राज्य शासनाच्या योजनेचा फायदा ग्रामीण भागातील जनतेला करून द्यावा, यासाठी आपल्या काही अडचणी असतील तर त्या आपण शासन स्तरावर सोडवू, पण आमच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना योजनाचा जास्तीत जास्त फायदा कसा करायचा याविषयी नेहमी मार्गदर्शन करीत असतात. कार्यक्रमात २०२३-२४ या वर्षाचे आराखडे तयार करण्यासाठी शाश्वत विकास, ध्येयमधून समतोल विकास साधला. त्यामुळे सर्व ९ थीम आणि १७ ध्येय यांचा समावेश झाला पाहिजे, असेही भूषण लाडवंजारी यांनी सरपंचांना सांगितले. प्रशिक्षणाचे नियोजन कल्पना पाटील यांनी केले.