यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील बामणोद येथील महिला मंडळ अधिकारी तथा सर्कल यांची साकळी, शिरसाड परिसरात वाळूसाठा देखरेखसाठी पर्यवेक्षक म्हणून नेमणूक केली होती. त्याठिकाणी त्या जात असताना रस्त्यात एक वाळू तस्कर ट्रॅक्टरसह ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये अवैध वाळू वाहतूक करीत असताना आढळून आला. त्यामुळे त्यांनी त्याला थांबवून विचारपूस केली. वाळू वाहतुकीचा परवाना आहे किंवा नाही, याबाबतची माहिती त्याच्याकडून घेत असताना वाळू तस्कराने मंडळ अधिकारी तथा सर्कल बबीता चौधरी यांना दमदाटी व शिवीगाळ करून ढकलून दिले. तसेच वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलायन केले. साकळी मंडळात वाळू तस्कराकडून मंडळ अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याची ही तालुक्यातील दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी शासकीय कामे कसे करावे? असा प्रश्न उपस्थित करून संपूर्ण महसूल यंत्रणेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्या वाळू तस्कराविरुद्ध सर्कल बबीता चौधरी यांनी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंडळ अधिकारी बबीता चौधरी यांना ढकलून देणारा आरोपी आणि दुसरा एक जण ट्रॅक्टरसह फरार झाला आहे.
मंडळात आणि बामणोद मंडळात तापी नदी किनारपट्टीवरून अवैध गौण खनिज उत्खनन करून गौण खनिज व अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात तस्करी होते. या वाळू तस्करांना अभय कोणाचे आहे..? याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
बबीता चौधरी यांच्या खासगी वाहनावरील चालक विशाल सपकाळे अशांसोबत यावल पोलीस स्टेशनला आले. त्याठिकाणी यावलचे तलाठी ईश्वर रामलाल कोळी यांना बोलावून घेतले. घटनेची वाहन चालक विशाल सपकाळे यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये तयार केलेली व्हीडीओ शुटींग त्यांना दाखविली. हात ओढून ट्रॅक्टर खाली ओढून शासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशी बबीता चौधरी यांनी फिर्याद दिल्याच्या कारणावरून यावल पोलीस स्टेशनला कलम ३५३, ३५४, ३७९, ३३२, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ४७(७) व ४८ (८) प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. तपास यावल पोलीस करीत आहे.