
सामाजिक बांधिलकीसह समानतेच्या तत्त्वावर मार्गदर्शन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रगती शाळेत अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी डॉ. आंबेडकरांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाने अत्यंत श्रद्धापूर्वक त्यांना अभिवादन अर्पण केले. सुरुवातीला डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल यांनी डॉ. आंबेडकरांच्या संविधान रचनेतील अमूल्य योगदानाची, सामाजिक समतेसाठी केलेल्या संघर्षाची आणि त्यांच्या दूरदृष्टीची उजळणी केली. विद्यार्थ्यांनी ‘माझा आदर्श-डॉ. आंबेडकर’ विषयावर मनोगत सादर करत त्यांच्या प्रेरणादायी विचारांना अभिव्यक्ती दिली. संस्थेच्या अध्यक्षांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. बाबासाहेबांच्या शिक्षणावरील आग्रही भूमिका, सामाजिक बांधिलकी आणि समानतेच्या तत्त्वांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. महापुरुषांच्या कार्यातून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी संविधानिक मूल्यांचे पालन, समाजसेवा आणि शिक्षणाद्वारे प्रगतीचा मार्ग स्विकारण्याची प्रतिज्ञा केली.
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला उपक्रम
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. संपूर्ण शाळेत श्रद्धा, आदर आणि कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाले होते. महापरिनिर्वाण दिनाचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. याप्रसंगी मुख्याध्यापिका संगीता गोहील, ज्येष्ठ शिक्षक अनिल वाघ यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


