साईमत जळगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघातर्फे समाजाच्या युवती व महिलांसाठी एक ऐतिहासिक अधिवेशन २५ जानेवारी २०२६ रोजी जळगावमध्ये आयोजित करण्यात आले आहे. धनाजी नाना विद्या प्रबोधनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाज कार्य महाविद्यालय, जळगाव येथे होणाऱ्या या अधिवेशनात सामाजिक, सांस्कृतिक, व्यवसायिक आणि विवाहविषयक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.
अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे, सौ मंदाताई एकनाथराव खडसे, सौ अरुणाताई शिरीष चौधरी, माजी नगराध्यक्ष सौ सीमाताई भोळे, सौ जयश्री ताई महाजन, गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. सौ वर्षाताई उल्हास पाटील आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यासोबतच स्वामीनारायण गुरुकुल सावदा येथील भक्ती प्रसाद महाराज, भोरगाव लेवा पंचायतचे कुटुंब नायक श्री ललित दादा पाटील, धनाजी नाना विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष आमदार श्री शिरीष मधुकरराव चौधरी, महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार सदस्य डॉ. प्रमोद हरी महाजन, नाशिक; श्री आर डी चौधरी, पुणे इत्यादी उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनाची उद्दिष्टे
महासंघाचे अध्यक्ष श्री अरुण दादा बोरोले यांनी सांगितले की, महासंघ लेवा पाटीदार समाजातील व्यक्ती आणि सामाजिक मंडळांना एकत्र आणून समाजातील समस्यांवर काम करणे हाच मुख्य उद्देश आहे. अधिवेशनाचे आयोजनही महासंघाच्या ज्येष्ठ सल्लागारांच्या संकल्पनेतून साकार झाले असून, शिस्तबद्ध नियोजन आणि महिलांसाठी मोफत निवासाची सोय केली जाणार आहे.
अधिवेशनाची संयोजिका सौ नीता प्रकाश वराडे यांनी सांगितले की, महिलांना व्यासपीठ मिळावे, अनुभव मांडता यावेत, ह्या उद्देशाने अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. राज्यभरातून तसेच गुजरात, मध्य प्रदेशहून सुमारे ७०० ते ८०० युवती आणि महिला सहभागी होणार आहेत.
अधिवेशनातील कार्यक्रम
अधिवेशन सकाळी प्रमुख वक्ते आपले विचार मांडतील, तर दुपारी खुले चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे.
मुख्य चर्चा विषयांत:
-
महिलांच्या विवाहविषयक समस्या
-
उद्योग व्यवसाय मार्गदर्शन
-
महिलांचे अधिकार
-
महिलांचे कला प्रदर्शन
-
अनुभवांची देवाणघेवाण
याशिवाय समाजात नावलौकिक प्राप्त महिला आणि युवतींचा विशेष सत्कार केला जाणार आहे.
महासंघाचे नेतृत्व आणि सहभाग
महासंघाचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच माजी नगराध्यक्ष, विभागीय संयोजक, सल्लागार सदस्य आणि विधी सल्लागार उपस्थित राहून अधिवेशनाचे विविध पैलूंवर नियोजन आणि व्यवस्थापन पाहतील. कार्यक्रमात सकाळी चहा नाष्टा, दुपारी सहभोजन आणि सायंकाळी चहा अशी सोय करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या आवाहनानुसार सर्व स्तरातील समाजातील युवती आणि महिला या अधिवेशनात सहभागी होण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे, जेणेकरून समाजातील एकत्रित विचारसरणीला व्यासपीठ मिळेल आणि समस्यांचे समाधान सापडेल.
