Run for Unity : ‘रन फॉर युनिटी’तून एकतेचा संदेश; धुळेकरांचा उत्स्फूर्त सहभाग

0
6

साईमत प्रतिनिधी

“अखंड भारताची निर्मिती ही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टीचा आणि दृढनिश्चयाचा परिणाम आहे. त्यांनी राष्ट्राच्या एकतेसाठी दाखविलेल्या चिकाटी, धैर्य आणि समर्पणामुळे आज आपण एकसंघ भारत म्हणून उभे आहोत. देशाच्या अखंडतेत त्यांचे योगदान अमूल्य आहे. युवकांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेत ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे प्रतिपादन आमदार अनुप अग्रवाल यांनी केले.

ते आज भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित ‘रन फॉर युनिटी’ या राष्ट्रीय एकता दौड उपक्रमात बोलत होते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

सकाळी आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून एकता दौडीला प्रारंभ झाला. तेथून पाचकंदील चौक, शहर पोलिस चौकी, जमनालाल बजाज रोडमार्गे रॅली टॉवर बगीचापर्यंत ही दौड नेण्यात आली. शहरात सर्वत्र “एक भारत, श्रेष्ठ भारत”, “सरदार पटेल अमर राहो” अशा घोषणा दुमदुमत होत्या. मार्गातील नागरिकांनीही उत्साहाने जयघोष करत सहभागींचे स्वागत केले.

रॅली टॉवर बगीचात पोहोचल्यानंतर सरदार पटेल यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर झालेल्या अल्प कार्यक्रमात आमदार अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की,
“सरदार पटेल यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील ५६५ संस्थानांचे भारतात विलीनीकरण करून अखंड राष्ट्राची पायाभरणी केली. त्यावेळी अनेक संस्थानिक स्वतंत्र राहण्याच्या भूमिकेत होते; मात्र पटेलांच्या ठाम नेतृत्वामुळे त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या त्यागामुळेच आज भारत एकसंघ राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर अभिमानाने उभा आहे.”

ते पुढे म्हणाले, “२०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरदार पटेल जयंतीनिमित्त देशभर ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन केले जाते. या उपक्रमाचा हेतू म्हणजे युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे हा आहे. आजच्या तरुणांनी सरदार पटेलांचा आदर्श घेऊन देश प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.”

या रॅलीत आमदार अग्रवाल यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, प्रदेश चिटणीस डॉ. सुशील महाजन, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी, हिरामण गवळी, विजय पाच्छापूरकर, जिल्हा सरचिटणीस शशी मोगलाईकर, पवन जाजू, सुनील कपिल, उपाध्यक्ष यशवंत येवलेकर, तसेच संग्राम पाटील, भगवान गवळी, हर्षकुमार रेलन, अनिल नागमोते, राकेश कुलेवार, भारती माळी, वैशाली शिरसाट, महिला मोर्चा अध्यक्षा आरती पवार, भाजयुमो अध्यक्ष आकाश परदेशी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष सागर कोडगीर, एससी मोर्चा अध्यक्ष प्रकाश पोळ, आणि विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

दौडीत शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC) तसेच युवा संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थी हातात तिरंगे आणि बॅनर घेऊन “भारत माता की जय”च्या घोषणांनी वातावरण भारून गेले. अनेक शाळांनी देशभक्तीपर गीतांद्वारे सरदार पटेलांना अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या अखंडतेचा, प्रगतीचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संकल्प व्यक्त केला. उपस्थितांनी ‘भारत एक आहे, भारत अखंड आहे’ असा जयघोष करत कार्यक्रमाची सांगता केली.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित धुळे येथील ‘रन फॉर युनिटी’ उपक्रमाने शहरात एकतेचा संदेश दिला. तरुण पिढीने त्यांच्या प्रेरणेतून राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी स्वीकारावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here