साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेल्याने घर बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेऊन घरातून १ लाख ६५ हजाराच्या रोकडसह सोने चांदीचे दागिने असा सुमारे २ लाख ३५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते १५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील रोहिणी येथे घडली.
सविस्तर असे की, नांदगाव पंचायत समितीत कनिष्ठ सहाय्यक म्हणून वाल्मिक वसंत दिघोळे (वय ४१) हे कार्यरत आहेत. ते कुटुंबासह रोहिणी गावी राहतात. ते पत्नी व मुले यांच्यासह भाऊबीजनिमित्त चौका, जि. छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. त्यामुळे रोहिणी येथील घर बंद होते. त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी दिघोळे यांच्या घराच्या कंपाऊंडचे कुलूप तोडून तसेच घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घराच्या तळमजल्यावरील कॉटखाली ठेवलेले २५ हजार रूपये तसेच वरच्या मजल्यावरील कपाटाचे लॉकर तोडून त्यातील १ लाख ६५ हजार रूपये रोख, ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे लॉकेट, ३० हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, ३ हजार रूपये किंमतीचे ओम सोन्याचे पान, ३ हजार रूपये किंमतीची सोन्याची नथ, ३ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे ओम पान लॉकेट, १२०० रूपये किंमतीच्या चांदीचे दोन जोड, ४ रूपये किंमतीच्या चांदीच्या अंगठ्या असा सुमारे २ लाख ३५ हजार ६०० रूपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी वाल्मीक दिघोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात भा.दं.वि. कलम ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.