जामनेर तालुक्यात नदी, नाल्यांना पूर

0
13

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील शेतकऱ्यांनी जून महिन्यातच धूळ पेरणीसह अल्प प्रमाणात झालेल्या पावसावर लाखो रुपयांची बियाणे निसर्गाच्या विश्वासावर शेतात टाकून जुगार खेळला होता. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात बळीराजाची पिके जिवंत राहील, अशा स्वरूपाचा रिमझिम पाऊस पडल्यामुळे पिके कशीतरी तग धरून होते. मात्र, त्यासोबतच शेतात तण (गवत) जोमाने वाढले होते. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात पिकांपेक्षा गवताचीच जास्त प्रमाणात वाढ झाल्यामुळे बळीराजाला निंदणीचा खर्च हा दुप्पट करावा लागला. त्यातच पावसाने दांडी मारल्याने बळीराजाने केलेला संपूर्ण खर्च वाया जातो की, काय? अशी परिस्थिती येऊन ठेपली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यावर वरुणराजाची कृपादृष्टी झाल्याने तालुक्यातील बळीराजा सुखावला आहे.

तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी आनंदित झाला आहे. बळीराजाची पावसाअभावी वाया जाणारी पिके पावसामुळे वाचली आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिना बळीराजाला पावला, असेच म्हणता येईल. तालुक्यातील वाघूर, कांग, सुर, सोन आणि वाकी ह्या प्रमुख नद्या आहे. ह्या काही नद्या अल्प प्रमाणात तर काही नद्या अक्षरशः कोरड्या होत्या. पावसाने ओढ दिल्याने बळीराजा संकटात सापडला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे या नद्यांवर असलेले धरणे, पाझर तलाव, भरायला सुरुवात झाली आहे.

कोल्हापुरी बंधारे वाहताहेत ओसंडून

नदी जोड प्रकल्पामुळे वाघूर नदीवर असलेले पिंपळगाव कमानी, शेरी, लोंढरी, सोनाळा, गोंडखेल, पाळधी ही धरणे, पाझर तलाव भरायला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरी बंधारे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे तालुक्यावर भविष्यात ओढवणारे पिण्याच्या पाण्याचे संकटही निवारणार आहे. तसेच बळीराज्यासाठी गरजेच्यावेळी आपल्या पिकांना पाणी देण्याची सोय उपलब्ध झाली आहे. पुढे रब्बीच्या हंगामासाठी सुद्धा पाण्याच्या उपलब्ध साठ्याची मदत होणार आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. अतिशय आनंदात दिसून येत आहे. अजूनही तालुक्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. अनेक नद्यांना पूर सुरू आहे. त्यामुळे शासनाने तालुकावासियांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here