पाच उमेदवारांचा पराभव करून ऋषभ क्षीरसागर २४ मतांनी विजयी

0
1

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाअंतर्गत लोहारा येथील डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववी सेमीच्या विद्यार्थ्यांकडून निवडणूक प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम नुकताच राबविण्यात आला. उपक्रमात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. आपण स्वतः मतदान करीत असल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.

विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक उपक्रम सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मतमोजणीपर्यंत निवडणूक प्रक्रिया कशाप्रकारे राबविली जाते, त्याची माहिती विशद केली. निवडणूक आयुक्त कशाप्रकारे निवडणूक जाहीर करतात. तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची कामे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. नंतर विद्यार्थ्यांमधूनच उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले. त्यानंतर त्या अर्जांची छाननी करण्यात येऊन उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले. नंतर निवडणूक तारीख जाहीर करण्यात आली. निवडणुकीच्या रिंगणात सहा उमेदवार उभे होते. त्यामध्ये मुलींसाठी तीन जागा व मुलांसाठी तीन जागा ठेवण्यात आल्या होत्या.

यावेळी मतदान कक्षाची निर्मिती करण्यात आली. विद्यार्थ्यांमधूनच मतदान अधिकारी १,२,३ म्हणून निवड करण्यात आली. सहाय्यक कर्मचारी १ अशा प्रकारे मतदान अधिकारी ठरविण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे मतदान केंद्रामध्ये मतदान घेण्यात आले. ही प्रक्रिया बॅलेट पेपरवर घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी आपले मत पेटीत जमा केले. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतमोजणी करण्यात आली. त्यामध्ये सहा उमेदवारांमधून ऋषभ प्रदीप क्षीरसागर ह्या विद्यार्थ्याला २४ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले, पर्यवेक्षक व्ही.एम. शिरपुरे, उपशिक्षक आर.आर.खोडपे, आर.जे.निकम, आर.सी. जाधव, बी.एन.पाटील, पत्रकार तथा समाजसेवक गजानन क्षीरसागर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here