अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ‘त्या’ ट्रक मालकाला महसूल प्रशासन बजावणार नोटीस

0
46

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

तालुक्यातील सालबर्डी शिवारात एका तलाठ्याने अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रकला शनिवारी, २ डिसेंबर रोजी पकडले होते. त्यानंतर हे वाहन मुक्ताईनगर तहसील कार्यालयात जमा केले होते. ट्रकमधील वाळू नसल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. अखेर सादर केलेल्या अहवालावरुन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ‘त्या’ ट्रक मालकाला महसूल प्रशासन ४५ हजाराची नोटीस बजावणार आहे.

सविस्तर असे की, तालुक्यात सालबर्डी शिवारात गेल्या ६ दिवसांपूर्वी अवैध वाळू वाहतूक करताना एक वाहन तलाठ्याने पकडून तहसील कार्यालय आवारात जमा केले होतेे. परंतु त्या वाहनातील वाळू तलाठी यांच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे वाहनातील वाळू महसूलच्या करामतीमुळे आणि जादुने गायब झाल्याची चर्चा तालुक्यात सुरू होती. याविषयी संबंधित तलाठी गायकवाड यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सुरुवातीला भ्रमणध्वनी उचलला नाही. नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी संपर्क साधल्यानंतर तलाठी यांनी सांगितले. या कारवाईविषयी तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाला अहवाल दिलेला आहे.

ट्रकमधील वाळूचा पंचनामा करून तलाठी यांनी तहसील कार्यालयात याप्रमाणे अहवाल सादर केलेला आहे. ट्रकमधील दोन ब्रास वाळू सालबर्डी येथील हनुमान मंदिराजवळ खाली केलेली असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे ट्रक मालकाला महसूल प्रशासन दोन ब्रास वाळूची किंमत ४५ हजार रुपयाची नोटीस देणार आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक करणारे वाहने मध्यरात्री, पहाटेच्या वेळेस वाहतूक करीत असतात. सुरुवातीला महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन पकडले जाते. नंतर ते वाहन कुठे आणि केव्हा जाते हे समजत नाही. त्या वाहनात किती ब्रास वाळू होती..? आणि त्या वाहन चालकावर काय कारवाई केली..? वाहनाचा आणि त्या वाहनातील वाळूचा पंचनामा केला किंवा नाही..? वाहन पकडल्यानंतर वाहनातील वाळू गायब कशी झाली कोणी जादू केली..? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित होत होते. त्या ट्रकमधील वाळू सालबर्डी येथे हनुमान मंदिराजवळ का खाली? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या त्या ट्रकवर सहा दिवस झाले तरी कारवाई होत नाही? असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यामुळे याकडे प्रांताधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here