कोरोना काळात सुश्रृषा करणाऱ्या शासकीय रुग्णालयातील कंत्राटी कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत कायम करा

0
29

साईमत लाईव्ह जळगाव  प्रतिनिधी 

कोरोना काळात कोविड-१९ विषाणू बाधित रुग्णांची स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा सुश्रृषा करणाऱ्या शासकीय रुग्णालयातील विविध संवर्गातील कंत्राटी कर्मचारी असलेल्या कोरोना योध्दयांना शासकीय सेवेत कायम करा अशी मागणी येथील विविध सामाजीक संस्थांच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. सदरचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या कडे देण्यात आले आहे.
निवेदन म्हटले आहे की, मागील दोन वर्षापासून संपूर्ण जगात कोविड-१९ विषाणूचा जीवघेणा फैलाव झालेला आहे.भारतात प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्री राज्यात कोरोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर विळखा बसला आहे. कोरोना संसर्गाची बाधा झालेल्या रुग्णांकडे जवळचे नातेवाईक सुद्धा वाळीत टाकल्यासारखे वागणूक देत असल्याचे आपण सर्वांनी अनुभवले आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची सेवा सुश्रृषा करण्यासाठी जीवाच्या भिती पोटी कोणीही पुढे येत नसल्याने शासनाने शासकीय रुग्णालये कोविड सेंटर येथे कंत्राटी स्वरुपात डॉक्टर्स, स्टॉफ नर्से(ब्रदर)/(सिस्टर),नर्सेस, डॉक्टर, वॉर्डबॉय, कक्षसेवक,डाटाएंट्री ऑपरेटर,आया, अब्युलस ड्रायव्हर,सुरक्षा रक्षक,सफाई कामगार इत्यादी यांची नियुक्ती केली होती. या कंत्राटी कामगारांनी आपल्यासह आपल्या कुटुंबियांच्या प्राणाची पर्वा न करता कोरोना बाधित रुग्णांची सेवा सुश्रृषा केली.


यामुळे महाराष्ट्र राज्यात कोरोना संसर्ग आटोक्यात येण्यात या कोरोना योद्ध्यांचे योगदान खूप महत्वाचे ठरले आहे. विशेष म्हणजे सर्व यंत्रणांकडून राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची भिती व्यक्त होत असतांना पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोना योद्ध्यांनी दिलेले योगदान व समर्पण यामुळे राज्यात संभाव्य तिसऱ्या लाटेचा परिणाम जाणवणार नाही अशी सकारात्मक परिस्थिती आहे. परंतू कोरोना संसर्गाची परिणाम कारकता कमी होताच शासनाने शासकीय रुग्णालयात कोरोना काळात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना (कोरोना योध्दयांना) कमी केले आहे. हा कोरोना योद्ध्यांवर मोठा अन्याय झाला आहे. वास्तविक राज्यातील आरोग्य विभागात मोठ्या संख्येने पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर कोरोना काळात कोरोना रुग्णांची सेवा सुश्रृषा करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घेता येणे शक्य आहे. परंतू शासनाने या संदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याने कंत्राटी कामगार यांचेवर अन्याय झालेला आहे. हा अन्याय दूर व्हावा व कोरोना योध्दयांना न्याय मिळावा अशी आपणाकडून अपेक्षा आहे.
मागण्या मध्ये कोरोना काळात शासकीय रुग्णालय व कोविड सेंटर येथे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित रुग्णांची सेवा सुश्रृषा करणाऱ्या कंत्राटी डॉक्टर्स,नर्सेस,वॉर्डबॉय, कक्षसेवक,डाटा एन्ट्री ऑपरेटर,सफाई कामगार, सुरक्षारक्षक इत्यादी कोरोना योद्ध्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे., कोरोना रुग्णांची सेवा सुश्रृषा करतांना मयत झालेले शासकीय रुग्णालय व कोविड सेंटर मधील कंत्राटी कामगारांना(कोरोना योद्धा) यांचे वारसांना आर्थिक मदत देवून वारसदारांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, कोरोना काळात कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या शासकीय रुग्णालय व कोविड सेंटर मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना(कोरोना योद्धा)यांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात यावे. समावेश आहे.
निवेदन देतांना महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, संविधान जागर समितीचे सरचिटणीस हरिश्चंद सोनवणे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक अध्यक्ष निलेश बोरा, मराठा सेवा संघाचे महानगराध्यक्ष हिरालाल चव्हाण,बहुजन क्रांती मोर्चाचे विजय सुरवाडे, भारतीय छप्परबंद मुस्लिम समाज सुधारक मंडळ राष्ट्रीय उपाध्यक्ष अजमल शहा, हजरत बिलाल संस्थेचे अध्यक्ष सै.अकील पहेलवान, खान्देशना एल्गारचे जिल्हा संघटक जगदिश सोनवणे आदी संघटनेचे पदाधिकारी व कोरोना योद्धे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here