महाटीईटी (MAHATET) परीक्षेसाठी जळगावात कडक बंदोबस्त
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी :
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आली असून शहरातील ३० परीक्षा केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत परीक्षा पार पडणार आहे. परीक्षा शांततेत, पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक सुरक्षा व प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत.
परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार, अनुचित प्रकार किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये आदेश जारी केला आहे. या आदेशाद्वारे परीक्षा काळात परीक्षा केंद्र परिसरात विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार, परीक्षा सुरू झाल्यापासून ते समाप्तीपर्यंत म्हणजेच सकाळी ८ ते सायंकाळी ५ या कालावधीत परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. केवळ परीक्षार्थी, नियुक्त अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस व होमगार्ड यांनाच या परिसरात प्रवेशाची परवानगी राहणार आहे.
यासोबतच, परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिघातील सर्व झेरॉक्स दुकानेही या कालावधीत बंद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षेत कॉपी किंवा इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, हा आदेश संबंधितांना वैयक्तिक नोटीस देणे शक्य नसल्यामुळे एकतर्फी स्वरूपात लागू करण्यात आल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
