साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी कन्या हायस्कुलला ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ आणि नर्मदा मेडीकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित केलेल्या रक्तगट तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, नर्मदा मेडीकल फाउंडेशनचे डॉ.अनिल शिंदे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.मयुरी शिंदे -जोशी, कन्या शाळेचे शालेय समिती अध्यक्ष प्रा.डॉ.एस.जे.शेख, संचालक भास्कर बोरसे, किरण पाटील, मगन पाटील, एम.एस.चौधरी, मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे उपस्थित होते.
शिबिराचे आयोजन संचालक किरण पाटील यांच्या सहकार्याने केले होते. यावेळी राजमाता जिजामाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी डॉ.मयुरी जोशी यांनी राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल माहिती देवून रक्तगटाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच डॉ.अनिल शिंदे यांनी रक्तदान करण्याचे फायदे सांगुन कितीही वेळेस रक्तदान करता येते, याबद्दल सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात संदीप घोरपडे यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्याविषयी माहिती दाखले देऊन मार्गदर्शन करत रक्तगट तपासणी किती महत्वाची आहे. याबद्दल विचार मांडले. रक्तगट तपासणी कामी नर्मदा मेडीकल फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे, सुत्रसंचालन जे.एस.पाटील तर आभार मुकेश अमृत पाटील यांनी मानले.