साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
येथील दामोताबाई सुर्वे वाचनालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त लोहारा येथील सुर्वे वाचनालयात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ नागरिक आदर्श शिक्षक प्रभाकर चौधरी, वाचनालयाचे अध्यक्ष बापू विनायक पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
‘माणुसकी समूहा’चे जळगाव जिल्हाध्यक्ष, समाजसेवक तथा पत्रकार गजानन क्षीरसागर यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांचे पुस्तकांवर किती प्रेम होते हे त्यांच्या जीवनावरील उदाहरणे देऊन स्पष्ट करून दिले. ज्येष्ठ नागरिक आदर्श शिक्षक प्रभाकर चौधरी यांनीही वाचन करा, वाचनाने मन व बुद्धी यांचा विकास होतो, असेही सांगितले. वाचनालयात सर्व वाचकांनी आवडीचे पुस्तकाचे वाचन केले. सुर्वे वाचनालयाचे अध्यक्ष बापु पाटील यांनी भरपूर पुस्तके आपल्या वाचनालयात उपलब्ध असून त्याचा लाभ प्रत्येक वाचकाने घ्यावा, असेही आवाहन केले. यावेळी लोहारा गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण उपस्थित होते.