साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
अग्नीशस्त्र आणि घातक हत्यार बाळगून लोकांवर दहशत निर्माण करणारा गुन्हेगारी वृत्तीचा रवी उर्फ माया महादेव तायडे (वय २५, रा. भोईवाडा मुक्ताईनगर) याच्यावर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यात दरोडा १, जबरी चोरी ५, गंभीर दुखापत १, आर्म ॲक्ट ४, असे ११ गुन्हे व करण्यात आलेली प्रतिबंधक कारवाई २ अशी गुन्ह्यांची पध्दत २०१७ पासून होती. मुक्ताईनगर पोलीस ठाणे अंतर्गत पाच, भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाणे अंतर्गत चार, भुसावळ शहर पोलीस ठाणे अंतर्गत एक, इगतपुरी जिल्हा नाशिक पोलीस स्टेशन अंतर्गत एक असे अकरा प्रकारचे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्यामुळे एमपीडीए कायद्याअंतर्गत माया तायडे याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आलेले आहे. त्याची रवानगी कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात केली असल्याचे मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी सांगितले.
स्थानबध्द व्यक्तीविरुध्द मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दरोडा, जबरी चोरी, दुखापत, अग्नीशस्त्र व घातक हत्यार कब्जात बाळगुन दहशत पसरविणे अश्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यास त्या गुन्ह्यांमध्ये वेळोवेळी अटक केल्यानंतर तो न्यायालयातून जामीनावर सुटताच पुन्हा भारतीय दंड विधान आणि मुंबई पोलीस कायदा अंतर्गत सराईतपणे गुन्हे करीत होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता तो व आपल्या सोबत असणाऱ्या गुंडासोबत अग्नीशस्त्र व घातक शस्त्रे सोबत ठेवून लोकांवर दहशत व भीती निर्माण करीत होता. त्यामुळे त्यास कायद्याचा अजिबात धाक राहिलेला नव्हता. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बाधा निर्माण होवून लोकांच्या मनात असुरक्षितेची भावना तयार झाली होती. दिवसेंदिवस वेगवेगळया तऱ्हेने गुन्हे करण्याची त्याची प्रवृत्ती बळावत असल्याने सर्व सामान्य लोकांच्या जिवितास तो उपद्रवी बनला होता. त्यामुळे त्याच्याविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले औषधी विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हीडीओ पायरेट) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ नुसार धोकादायक व्यक्ती अशा संज्ञेत तो मोडत असल्याने त्याच्याविरुध्द कारवाई करणे आवश्यक होते. त्यानुसार मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश एन. मोहिते यांनी त्याच्याविरुध्द चौकशी पूर्ण करुन १३ नोव्हेंबर २०२३ रोजी जळगावचे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाची पडताळणी करुन पोलीस अधीक्षकांनी जळगाव जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे पाठविलेला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेला आदेश क्र. १०/२०१०. दंडप्र/कावी/एमपीडीए/०३/२०२४ जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, जळगाव ३ फेबु्रवारी २४ भोईवाडा, मुक्ताईनगर यांनी बदलीचे आदेश लागू केले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय अधिकारी मुक्ताईनगर राजकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक नागेश एन. मोहिते आणि त्यांच्या पथकातील प्रशासकांनी त्याला ३ फेबु्रवारी २०२४ रोजी ताब्यात घेऊन जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर येथे पाठविले. भविष्यात मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंडांवर अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डी.वाय.एस.पी.राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. नागेश मोहिते, स.पो.नि. संदीप दुनगहु, पो.उप.नि. राहुल बोरकर, पो.हे.कॉ. विनोद सोनवणे, पो.ना. संदीप वानखेडे, पो.कॉ. सचिन जाधव, पो.ना. विजय पढार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हे.कॉ. सुनील दामोदरे यांनी केली आहे.