साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी :-
आमदार रवी राणा यांनी सरकारला पाठिंबा देण्यासाठी खोके घेतल्याचा आरोप अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर केला आहे. त्यांच्या या आरोपावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार रवी राणा यांनी जे विधान केले आहे ते अत्यंत चुकीचे आहे. एका व्यक्तीवर आरोप करणे म्हणजे सर्वच आमदारांवर आरोप करण्यासारखे आहे. कोणताही आमदार विकावू नाही. पण तुमच्या एका आरोपामुळे चाळीस आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. म्हणून रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावे, असे खडे बोल शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांना सुनावत बच्चू कडू यांची बाजू घेतली.
रवी राणा यांनी शब्द मागे घेतले नाही, तर ही गोष्ट चुकीची होईल आणि लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल. ४० वर्षांचे राजकीय करियर पणाला लावून लोक तुमच्यासोबत मैदानात उतरले आहेत. त्यामुळे रवी राणा यांना आवर घालावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांना करतो. तसेच दोघांनीही शांत बसावं, हीच प्रार्थना असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
राज्य सरकारने ठाकरे गटासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्यानंतर टीका होत आहे. यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. सुरक्षा काढण्यावरून कुणी राजकारण करत नसतो. एखाद्या नेत्याची सुरक्षा काढल्याने कुणाला आनंद होत नाही. सुरक्षेच्या बाबतीत एक समिती निर्णय घेत असते. या समितीने घेतलेल्या आढाव्यानुसार सुरक्षेबाबत निर्णय घेतला जातो. कोणत्याही नेत्याची सुरक्षा काढण्यामध्ये सरकारला स्वारस्य नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
दरम्यान कालच्या सामनातून कटुता संपवावी अशी साद शिवसेनेने देवेंद्र फडणीस यांना घातली आहे. यावरूनही मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यापूर्वीच अशी साद घातली असती तर आज ही वेळ आली नसती. ज्यावेळी फाटा फूट झाली, त्यावेळी आम्ही समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याच वेळी ही साद घातली गेली असती, तर आता बासुंदी कोण आणि अमुक कोण असे म्हणून कटुता संपवा… अशी म्हणण्याची वेळ आली नसती, असा चिमटा गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना काढला.